
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ आणि नवनीत राणा यांच्या नावांची चर्चा असतानाच अजित पवार गटाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज रात्री केली. राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘सातपुडा’ निवासस्थानी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते. छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रीपद देण्यास भाजप अनुकूल नसल्याने जैन यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
राजेंद्र जैन यापूर्वी विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास छगन भुजबळ यांनी होकार दर्शविला होता. परंतु त्यापूर्वी समीर भुजबळ यांचा शपथविधी करावा अशी भुजबळ यांची मागणी होती. दिल्लीतील हायकमांडला विचारून त्यासंदर्भात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. नवनीत राणा यासुद्धा या जागेसाठी इच्छुक होत्या, मात्र आपली जागा भाजपला देण्यास राष्ट्रवादी तयार नव्हती. भुजबळ यांनी त्या मुद्दय़ावर बोलण्यासही नकार दिला होता.

























































