
कथित मालमत्तेच्या फसवणूक व्यवहारात गुन्हा दाखल झालेल्या वकिलाला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मालमत्तेच्या व्यवहारात अर्जदाराची स्वाक्षरी कुठे आहे, असा सवाल करत हायकोर्टाने वकिलाला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.
मूळ जमीन मालकाची फसवणूक करून 13 फेब्रुवारी रोजी सेल डिडद्वारे मालमत्तेचे हस्तांतरण करण्यात आल्याचा आरोप पेशाने वकील असलेल्या जयदीप डोके यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या बाणेर पोलीस ठाण्यात डोके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकपूर्व जामिनासाठी अॅड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी अर्जदाराच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, जयदीप डोके या व्यवहारात कुठेही स्वाक्षरी करणारे, साक्षीदार किंवा लाभार्थी नाहीत तसेच तक्रारदार मूळ जमीन मालकाने कोणत्याही दस्तऐवजावर स्वाक्षरी केलेली नाही, न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अर्जदाराचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.



























































