प्राण देऊ, पण जमीन देणार नाही; शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमचे रक्त सांडले तरी चालेल, प्रसंगी आत्महत्या करू, पण आमच्या जीवावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत हजारो संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या विराट मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी आक्रमक होत प्रशासनाची ड्रोन मोजणी बंद पाडली आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

कोल्हापुरात विराट मोर्चा

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. या आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील महिला या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. “आमच्या जमिनी गेल्यावर आमच्या मुला-बाळांची लग्नं कशी होणार? आमचे संसार कसे चालणार?” असे उद्विग्न सवाल करत महिला आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या प्रकल्पाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, आंदोलक आणि शेतकऱ्यांना नको असलेला शक्तिपीठ महामार्ग करु नये. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही. शक्तिपीठ महामार्गाला समांतर असा नागपूर-रत्नागिरी मार्ग आहे. मग असे असताना नव्या मार्गाची गरज काय? सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. हे सगळे शेतकरी शक्तिपीठ महामार्ग झाल्यास भूमिहीन होतील. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आणि महापूराचा तडाखा बसतो. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास महामार्गामुळे अनेक हेक्टर शेती उद्ध्वस्त होईल. या महामार्गामुळे 73 ते 76 गावांमधील शेतजमीन जाणार आहे.

दरम्यान, कोल्हापुरात मोर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कारवाई करत प्रशासनाला रोखले. विटा परिसरातील नागेवाडी आणि माऊली भाग्यनगर येथे महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाने ड्रोन मोजणी सुरू केली होती. याची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोजणीला कडाडून विरोध केला. यावेळी मोजणी अधिकारी आणि संतप्त शेतकरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. तणाव वाढल्याने प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल आणि तहसीलदार योगेश टोणपे यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, “जेव्हा आम्हाला हा रस्ताच नकोय, तर तुम्ही मोजणी करताच कशाला?” असा थेट सवाल शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना केला आणि मोजणीचे काम पूर्णपणे बंद पाडले.