
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेवरील त्यांच्या निवडीचे श्रेय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना दिले आहे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सोनिया गांधींनी आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच संधी उपलब्ध करून दिल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना खरगे म्हणाले, “ही माझी १३ वी निवडणूक आहे… मी सोनिया गांधींचा आभारी आहे. त्यांनी मला जनतेची सेवा करण्याच्या संधी दिल्या आहेत.”
दरम्यान, कर्नाटकातून राज्यसभेवर काल बिनविरोध निवडून आलेल्या चार उमेदवारांमध्ये खरगे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर या निकालावर शिक्कामोर्तब झाला. चार रिक्त जागांसाठी केवळ चारच उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि १८ जून रोजी होणारे पूर्वनियोजित मतदान घेण्याची आवश्यकता उरली नाही.
राज्यसभेत खरगे यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री के. रहमान खान यांचे पुत्र आणि शिक्षणतज्ज्ञ मन्सूर अली खान, काँग्रेसचे मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे अध्यक्ष पवन खेडा आणि कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य व भाजपचे एकमेव उमेदवार एम. नागराजा यांचा समावेश आहे.

























































