
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झााला आहे. या प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल म्हणाले की, संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. 8 जून, 10 जून आणि 11 जून रोजी अमेरिकेने तीन जहाजांवर हल्ले केले. या जहाजांवर एकूण 68 हिंदुस्थानी नागरिक होते आणि त्यापैकी तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्दही उच्चारला नाही, असे केजरीवाल म्हणाले.
तसेच 8 जूनला हल्ला झाला तेव्हा मोदी गप्प राहिले, 10 जूनला हल्ला झाला तेव्हाही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही आणि 11 जूनलाही त्यांनी मौनच पाळले. याच काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांचे देशातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान म्हणून अभिनंदन केले. त्यावर मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानत भविष्यात त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.
यावर प्रश्न उपस्थित करत केजरीवाल म्हणाले, “ज्या व्यक्तीच्या कारवाईत तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाला, त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान कसे म्हणू शकतात?”
परराष्ट्र धोरणावरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही अमेरिकेकडून हिंदुस्थानींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात आला नाही.उलट अमेरिकेने आपले आदेश न मानल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला, असेही केजरीवाल म्हणाले.
“मोदी ट्रम्प यांच्यासमोर इतके हतबल का आहेत? त्यांनी देशाची प्रतिष्ठा कमी केली आहे,” अशी टीका केजरीवाल यांनी केली. जर रशिया, चीन, इराण किंवा इतर कोणत्याही देशाचा नागरिक अशा प्रकारच्या कारवाईत मृत्युमुखी पडला असता, तर त्या देशांनी अमेरिकेला कठोर उत्तर दिले असते. मात्र, हिंदुस्थानींच्या मृत्यूवर देशाचे पंतप्रधान गप्प असल्याचे त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधताना केजरीवाल यांनी त्यांना “खुनी” संबोधले. तसेच, “भारताचे 140 कोटी नागरिक कमकुवत नाहीत. आज देशाचा पंतप्रधान गप्प असला तरी देशातील जनता गप्प बसणार नाही,” असे ते म्हणाले.
हिंदुस्थानची 5000 वर्षांची संस्कृती असल्याचे सांगत त्यांनी भविष्यात देशाला मजबूत नेतृत्व मिळेल आणि भारतीयांचा झालेला अपमान विसरला जाणार नाही, असेही नमूद केले.
Donald Trump, you will be held accountable for the Indian lives lost. You are a cowardly, cold-blooded murderer.
It is unfortunate that PM Modi remains silent, but soon, India will have a strong Prime Minister who will make you pay for your misdeeds. pic.twitter.com/MkRNZT7wzi
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 15, 2026



























































