
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची विशेष कर्तव्य अधिकारी धारावी पुनर्विकास प्रकल्प या पदावर बदली करण्यात आली, तर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त या पदावर करण्यात आली आहे.
राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. सिंघल यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अश्विनी जोशी यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची वन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नेमणूक करण्यात आली आहे. उद्योग विकास आयुक्त म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची बदली आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर करण्यात आली आहे.
जेनिथ चंद्रा डोनथुला यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया जिल्हा परिषद, अनय नावंदर मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला जिल्हा परिषद, डॉ. बी सरावनन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग, नांदेड, लघिमा तिवारी सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा उपविभाग नंदुरबार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

























































