
>> श्रीप्रसाद प. मालाडकर
मराठी संगीत रंगभूमीवर एक काळ गाजवलेला तारा आज प्रसाद सावकार यांच्या निधनाने निखळला. रंगभूमीवर गाजणारा एक सूर कायमचा थांबला. कसदार अभिनय आणि तसाच कसदार आवाज लाभलेल्या प्रसाद सावकारांनी रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांचे खरे नाव सांबप्रसाद, पण ते कायम ओळखले गेले ते प्रसाद याच नावाने. त्यांचे वडील रघुवीर सावकार आणि आई राधा रघुवीर सावकार. रघुवीर सावकार हेदेखील तत्कालीन ख्यातकीर्त गायक-नट होते. रघुवीर सावकार यांनी ‘रंगबोधेच्छु नाटय़ समाज’ची स्थापना 1924 मध्ये केली होती; त्या नाट्य मंडळीत सांबप्रसाद सावकार यांच्यावर बालपणीच नाट्य, संगीत यांचे संस्कार झाले. गायन, अभिनयाचे त्यांचे आद्य गुरू वडीलच होते. ‘जिंजीहून सुटका’ या नाटकात बाल शिवाजीच्या भूमिकेद्वारे प्रसाद सावकार यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांचे काका दत्ताराम सावकार यांचेही संवादिनी वादनावर प्रभुत्व असल्याने गोमंतकात संगीताच्या वातावरण, संस्कारात वृद्धी होत गेली.
नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकात प्रसाद यांनी वडिलांसह कृत्तिकेची स्त्राr भूमिका साकारली. नंतर साधू, जलशातले गायक, वैशाख शेठ या भूमिका संगीत नाटकात एकाच वेळी करून त्यांनी एक अबाधित विक्रमच प्रस्थापित केला. गोपीनाथ सावकार यांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘संगीत विद्याहरण’, ‘संगीत मानापमान’ या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. हौशी रंगभूमीवर ‘करीन ती पूर्व’ या आणि इतर नाटकांतूनही भूमिका केल्या. मो.ग. रांगणेकर यांच्या ‘नाटय़निकेतन’ संस्थेच्या ‘रंभा’, ‘कुलवधू’, ‘कोणे एकेकाळी’, ‘एक होता म्हातारा’ या नाटकांतील प्रसाद यांच्या विविध भूमिका गाजल्या. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकात त्यांची ‘गोकर्ण’ ही भूमिका अविस्मरणीय ठरली आहे. 1952 मध्ये ‘पेडगावचे शहाणे’ चित्रपटाच्या वेळी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते राजा परांजपे यांनी त्यांच्या ‘सांबप्रसाद सावकार’ नावाचे नामांतर प्रसाद सावकार केले. ‘पेडगावचे शहाणे’, ‘गोरा कुंभार’ अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत, गाणी स्वतः गायली आहेत. 1960 ते 1972 या एका तपाच्या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करण्यात, नाटय़ संगीताला नवसंजीवन देणाऱया प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे आद्य गायक नट होते. 1960 मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके, ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ तसेच ‘संगीत सुवर्णतुला’ लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन्ही नाटकांत प्रसाद सावकार यांनी गायलेली पदे अविस्मरणीय झाली आहेत. ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ या नाटकात संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीतात प्रसाद सावकार यांची भूमिका त्यांनी गायलेली ‘जय गंगे भागिरथी’, ‘सावन घन गरजे’ ही नाटय़पदे अविस्मरणीय आहेत. त्यांनी प्रसाद सावकार यांना गायक, नटश्रेष्ठ लौकिक मिळवून दिला.
‘सुवर्णतुला’ नाटकात त्यांनी कृष्णाची भूमिका केली. ‘रतीहून सुंदर’, ‘रागिणी मुख चंद्रमा’ ही पदे कालातीत ठरली. मदनगोपाळ भूमिका त्यांनी साकारली. पंडित राम मराठे यांच्यासह ‘बसंत की बहार आयी’ हे युगुल गीतदेखील प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांची ‘भरे मनात सुंदरा’, ‘नारायणा रमारमणा मधुसूदना मनमोहना’ ही नाटय़पदेही रसिकप्रिय आहेत. ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर यांच्या ‘संगीत कटय़ार काळजात घुसली’ या नाटकात सदाशिव ही भूमिका आणि ‘घेई छंद मकरंद’ हे पद प्रसाद सावकरांनी अजरामर केले. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘तो राजहंस एक’ या नाटकात त्यांनी कृष्णाची भूमिका केली. ‘अवघा रंग एकचि रंग झाला’ हे त्यांचे नाटक विशेष लोकप्रिय झाले. भरदार, श्रवणीय, सुमधुर आवाज; स्वच्छ, शुद्ध वाणी; गायकीत सुश्राव्य ताना, मिंड, हरकती असल्याने त्यांच्या स्वराची, गाण्यांची स्वरमोहिनी आजही आहे. पं. नारायणराव व्यास हेसुद्धा त्यांचे गुरू होते. स्वरराज छोटा गंधर्व त्यांचे श्रवणगुरू होते. अनेक मानसन्मान लाभले होते. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत रंगभूमीवरील एक मोठा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
(लेखक ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ञ आहेत.)




























































