
अर्धा जून महिना उलटला आहे. मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईकर उकाड्याने आणि दमट हवेने हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून वर्सोवा बीचवर शेकडो लोक रात्री अंथरूण-पांघरूण घेऊन झोपायला जात आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वर्सोवा हा मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. तेथे कायम नागरिकांची गर्दी असते. मात्र, याच किनाऱ्यावर सध्या रात्रीच्या वेळी नागरिक झोपण्यासाठी अंथरूण-पांघरूण घेऊन गर्दी करताना दिसत आहेत. अक्षरशः संपूर्ण किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी नागरिक दाटीवाटीने झोपलेले दिसून येत आहेत. आजूबाजूच्या वस्त्या आणि झोपडपट्ट्यांतील हे लोक आहेत. मुंबईतील वाढती उष्णता, लांबलेला मान्सून, तसेच रात्रीच्या वेळीही उकाड्यात झालेली वाढ यामुळे हे नागरिक उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी समुद्रकिनारी झोपण्यासाठी येत आहेत, असे यामागचे कारण सांगितले जात आहे.
पाऊस कधी पडणार?
मुंबईकरांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. राज्यात सध्या पावसाची नोंद तुरळक ठिकाणी होत आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान अनुकूल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्याच्या कोकण किनारपट्टीवर (मुंबईसह) २४-२५ जूनच्या आसपास पाऊस पडण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज आहे.





























































