
दादर-गोरखपूर’ ट्रेन कायमस्वरूपी करतानाच ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ बंद करणाऱ्या मध्य रेल्वेची अनास्था कायम आहे. ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यकारी व्यवहार्यता (ऑपरेशनल फिजिबिलिटी) तपासण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी एप्रिलमध्ये दिले. त्याला दोन महिने उलटल्यानंतरही ‘दादर-रत्नागिरी’ ट्रेनसंबंधी हालचाली थंड बस्त्यात आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या अनास्थेपुढे कोकण रेल्वे प्रशासनही हतबल झाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर अनेक वर्षे प्रवाशांच्या सेवेत धावलेली ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ कोरोना काळात २०२० मध्ये बंद केली. ती गाडी शॉर्ट टर्मिनेट करून ‘दिवा-रत्नागिरी पॅसेंजर’ म्हणून चालवण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून चालवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी वेळोवेळी केली; पण त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला. याचदरम्यान ‘दादर-गोरखपूर’ ट्रेन कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘दादर-रत्नागिरी’ ट्रेनची कार्यकारी व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले. त्याला दोन महिने उलटल्यानंतरही कार्यवाहीची गाडी पुढे सरकलेली नाही. गाडी पूर्ववत सुरू करण्याबाबत कोकण रेल्वेनेही वारंवार पत्रव्यवहार केला; परंतु मध्य रेल्वेने त्यांच्याही पत्रांची गंभीर दखल घेतली नसल्याचे उघड झाले आहे.
‘कोरे’ म्हणते, ‘मरे’ने सुधारणा करायला हव्यात!
“दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादर येथून सुरू करण्याबाबत आम्ही मध्य रेल्वेशी अनेकदा पत्रव्यवहार केला. प्रवाशांच्या मागण्या मांडल्या. हा मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील मुद्दा आहे. आमच्या हद्दीत कोणतीही अडचण नाही. दादर येथे रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे असेल तर त्यांनी आवश्यक त्या सुधारणा करायला हव्यात,” अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी दिली.
महाराष्ट्रातील गाड्या मुंबईपर्यंत येऊ न देण्याचे मध्य रेल्वेचे धोरण दिसते. कोकण रेल्वेची रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिव्यापुढे येऊ शकत नसेल तर कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या तेजस एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस यांसारख्या गाड्या अनुक्रमे करमळी, थिवी आणि सावंतवाडीपर्यंतच चालवाव्यात.
-अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती





























































