महापालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाचा बडगा, अंधेरीत फूटपाथवरील 9 बेकायदा दुकाने निष्कासित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फूटपाथवरील बेकायदेशीर दुकाने व शेडवर महापालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत प्रशासनाकडून फूटपाथवर अतिक्रमण करून उभारलेली ९ बेकायदा दुकाने निष्कासित करण्यात आली. त्यापैकी एका बेकायदा दुकानावर जप्तीची कारवाई करण्यात आली असून बेकायदेशीरपणे उभारलेले शेड आणि पायऱ्या तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

अंधेरी परिसरात पदपथांवर दुकाने, शेड उभारून पादचाऱ्यांच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार परिमंडळ ४ च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली विभागांतर्गत कार्यरत परिरक्षण, इमारत व कारखाना, अनुज्ञापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या बेकायदा दुकाने व शेडवर कारवाई केली. कारवाईदरम्यान प्रशासनाने वीरा देसाई मार्गावरील आठ व फन रिपब्लिक मार्गावरील एक बेकायदा दुकान निष्कासित केले. कारवाईसाठी आंबोली पोलीस ठाण्याकडून पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे परिसरातील फूटपाथ मोकळे झाले आहेत.