
हिंदुस्थानी शेअर बाजारातील सर्वात मोठा जिओचा आयपीओ येणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक मंडळाने त्यांच्या बहुप्रतीक्षित आयपीओसाठी ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस्’ला मंजुरी दिली आहे, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना अंबानी म्हणाले, “हा माझ्यासाठी, संपूर्ण रिलायन्स परिवार आणि लाखो भागधारकांसाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. रिलायन्स आणि भागधारकांमधील नाते अत्यंत घट्ट व पवित्र आहे, जे परस्पर विश्वास, आदर आणि एकत्र पुढे जाण्याच्या भावनेवर आधारलेले आहे.” मुकेश अंबानी यांनी आकाश, ईशा आणि अनंत अंबानी हे जिओच्या आयपीओ प्रक्रियेचे नेतृत्व करत आहेत, असे जाहीर केले. जिओची सुरुवात होऊन 10 वर्षे पूर्ण होत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. अंबानी म्हणाले की, ‘व्हॉइस’ (कॉलिंग) सेवा मोफत आणि हाय-स्पीड डेटा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन डिजिटल विषमता दूर करण्याच्या उद्देशाने जिओचा प्रवास सुरू झाला होता. दरम्यान, जिओच्या युजर्सची संख्या सध्या 52.4 कोटींच्या पुढे गेली आहे, तर 5जी ग्राहकांची संख्या 26.8 कोटींपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, जिओ प्लॅटफॉर्म्सने आर्थिक वर्ष 2026 मध्ये 1,46,885 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो वार्षिक आधारावर 14.6 टक्क्यांनी अधिक आहे.
एसबीआयची मोहीम
एसबीआय लाइफ इन्शुरन्सने ‘फादर्स डे’निमित्त ‘पापा है ना’ ही नवी मोहीम आणली आहे. डिजिटल उपक्रमांतर्गत या नवीन डिजिटल मोहिमेचा व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. वडिलांची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असते.
बेनक्यूचे नवे स्टोअर
बेनक्यूने मुंबईतील लॅमिंग्टन रोडवर देशातील पहिले नवीन एक्सक्लुसिव्ह मॉनिटर ब्रँड स्टोअर उघडले. या स्टोअरमध्ये 8 विशेष निर्मित मॉनिटर श्रेणी एकाच ठिकाणी मिळतील. मुंबईकरांना हे स्टोअर फार उपयोगी पडणार आहे.
क्यूएमएस सर्व्हिसेस
क्यूएमएस मेडिकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या मेनबोर्डवर यशस्वी प्रवेश झाल्याची घोषणा केली. मेनबोर्डवर स्थलांतर पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे 1.93 कोटी इक्विटी शेअर्स असून कंपनीच्या शेअरची किंमत 108.95 रुपये आहे.
हॉलमार्कची किमया
हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन यंत्रणा आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या प्रबळ ग्राहक रेकॉर्ड व्यवस्थापन प्रक्रियेमुळे एक हरवलेली सोन्याची बांगडी तिच्या खऱ्या मालकिणीपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आली आहे.
मर्सिडीज बेंजची एस-क्लास कार लाँच
मर्सिडीज बेंजने हिंदुस्थानात सेडान एस-क्लासचे नवीन मॉडेल लाँच केले. या मर्सिडीजची सुरुवातीची किंमत 2.20 कोटी रुपये आहे. या वेळी कंपनीने कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. नवीन कारचे बुकिंग सुरू करण्यात आले असून कारची डिलिव्हरी या वर्षी दिवाळीच्या आसपास होईल. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या कारची किंमत 1.85 कोटी रुपये होती, तर नव्या एस-क्लासची किंमत 35 लाख रुपयांनी महाग आहे. नवीन एस क्लास कार केवळ एस-450 ई व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
पोर्शेने हैदराबादेत उघडले सेंटर
पोर्शे इंडियाने हैदराबादेत नव्या पोर्शे सेंटरचे उद्घाटन केले. या वेळी पोर्शे इंडियाचे हेड आशुतोष दीक्षित उपस्थित होते. जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी पोर्शेचे हे देशातील सर्वात मोठे सुविधा केंद्र बनणार आहे. ही नवी सुविधा हैदराबादमधील पोर्शेचे दुसरे विक्री केंद्र आहे. हे जवळपास 2800 स्क्वेअर मीटर परिसरात पसरले आहे. पोर्शेचे विक्री सेंटर, सेवा आणि स्पेअर पार्ट्स एकाच ठिकाणी मिळणार आहेत. पोर्शेच्या नेटवर्कमध्ये आता देशात 14 विक्री केंद्रे आणि 10 सेवा केंद्रांचा समावेश आहे.
वोग आयवेअरच्या नव्या संग्रहाचे अनावरण
वोग आयवेअरने आपल्या नव्या संग्रहात आठ चष्मा शैली सादर केल्या आहेत. या संग्रहामध्ये विविध रचना, आकार आणि शैलींचा समावेश करण्यात आला असून तो आधुनिक ग्राहकांची प पसंद लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. याचबरोबर ‘वोग आयवेअर जर्नीज’ ही नवी मोहीम सादर केली. अभिनेत्री क्रिती सॅनन हिची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली.
आर्सेलर मित्तलचा 31 जुलैला 20वा वर्धापन दिन
या वर्षी 31 जुलै रोजी होणाऱ्या आपल्या 20 व्या वर्धापन दिनापूर्वी आर्सेलर मित्तलने कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांचा एक विशेष व्हिडीओ संदेश जारी केला आहे. न्यूयॉर्कमध्ये 15 आणि 16 जून रोजी झालेल्या ‘वर्ल्ड स्टील डायनॅमिक्स’च्या वार्षिक ‘ग्लोबल स्टील डायनॅमिक्स फोरम 2026’ मधील उपस्थितांसाठी हा संदेश देण्यात आला.
क्रिकची फॉरेन ॲडमिट्सशी भागीदारी
क्रिक लिमिटेडने ‘एज्युमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये धोरणात्मक गुंतवणुकीची घोषणा केली. ही कंपनी ‘फॉरेन ॲडमिट्स’ या एआय-आधारित विद्यार्थी गतिशीलता प्लॅटफॉर्मची संचालक आहे, जिने 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा दिली आहे आणि 1,500 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या शैक्षणिक कर्जाची सोय केली आहे.





























































