
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी अखेर पक्षांतर्गत वाढत्या तीव्र दबावासमोर झुकत आपल्या पंतप्रधानपदाचा आणि मजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे त्यांनी ही घोषणा केली. जुलै 2024 मध्ये पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आतच स्टार्मर यांना पायउतार व्हावे लागले आहे. या राजीनाम्यामुळे ब्रिटनमध्ये गेल्या दशकभरात सातव्यांदा नवीन पंतप्रधान निवडला जाणार असून ब्रिटनच्या राजकारणातील अस्थिरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
गेल्या आठवड्यात मेकरफिल्ड मतदारसंघात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या पोटनिवडणुकीत ग्रेटर मँचेस्टरचे लोकप्रिय माजी महापौर आणि स्टार्मर यांचे कट्टर पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी अँडी बर्नहॅम यांनी दणदणीत विजय मिळवला. बर्नहॅम यांनी या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून संसदेत पुनरागमन केले. हा विजय थेट स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठीच होता. बर्नहॅम संसदेत शपथ घेणार त्याच दिवशी स्टार्मर यांनी राजीनामा दिला आहे. कुटुंबासोबत चर्चा केल्यानंतर स्टार्मर यांनी हा निर्णय घेतला.
Keir Starmer announces resignation as Prime Minister of the United Kingdom and leader of the Labour Party
(Photo source: Reuters) pic.twitter.com/5pstJAbTTv
— ANI (@ANI) June 22, 2026
जुलै 2024 च्या दणदणीत विजयानंतर मजूर पक्षाची लोकप्रियता अत्यंत वेगाने घसरली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. देशाचा आर्थिक विकास दर वाढवणे, ढासळलेली सार्वजनिक आरोग्य आणि सेवा व्यवस्था सुधारणे आणि वाढती महागाई नियंत्रित करणे यात स्टार्मर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले.
ज्येष्ठ नागरिकांचा विंटर फ्युएल अलाउन्स रद्द करण्याचा निर्णय आणि वादग्रस्त अब्जाधीश जेफ्री एपस्टाईनचे मित्र राहिलेले पीटर मँडेलसन यांची अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून केलेली नियुक्ती स्टार्मर यांच्या अंगाशी आली. या निर्णयामुळे पक्षाचे स्वतःचे खासदार आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. स्टार्मर यांच्या पक्षातील 100 पेक्षा जास्त खासदारांनी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनीही रविवारी स्टार्मर लवकरच राजीनामा देतील असे भाकीत वर्तवले होते. यासंदर्भात त्यांनी ट्रूथ सोशल यावर पोस्टही केली होती.



























































