
दुसऱ्या पक्षातील खासदार, आमदार फोडायचे, त्यांना विकत घ्यायचे आणि या सर्व प्रकाराला ऑपरेशन लोटस म्हणालये, या भाजपच्या प्रवृत्तीबाबत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. भाजपच्या तथाकथित ऑपरेशन लोटसवर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी जोरदार टीका केली आहे. हे ऑपरेशन लोटस नव्हे, हे तर ऑपरेशन चिखल आहे, असे ते म्हणाले. जिथे कमळ उमलू शकत नाही, तिथे भाजप चिखल पसरवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी भाजपवर खासदार विकत घेतल्याचा आरोप केला आहे. खासदार आणि आमदार विकत घेण्यासाठीच सरकार आहे का? असा सवाल खेरा यांनी केला आहे.
पवन खेरा म्हणाले की, जिथे कमळ उमलले नाही, तिथे चिखल पसरवला जात आहे. त्यांच्या अहंकाराला इतका धक्का बसला की, एब की बार ४०० पारचा नारा दिल्यानंतर ते २४० वरच अडकले, म्हणून आता ते खासदार विकत घेत आहेत. ते असे का करत आहेत? त्यांचा कोणावर विश्वास नाही? खासदार आणि आमदार विकत घेण्यासाठीच ते सरकार स्थापन करतात का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. झारखंड आणि मध्य प्रदेशसह सर्वत्र घोडेबाजार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.


























































