परिवहनचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, भाईंदरमध्ये बसचे चाक निखळले; प्रवासी बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या भाईंदर परिवहन सेवेच्या बसचे चाक गुरुवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी निखळले. दैव बलवत्तर म्हणून प्रवासी बचावले. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच या अपघातामुळे परिवहनचा भोंगळ कारभारदेखील चव्हाट्यावर आला.

मीरा-भाईंदर परिवहन सेवेच्या बसेसची देखभाल व दुरुस्ती खाजगी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे. मात्र हे काम व्यवस्थित होत नसल्याने अपघात होत आहेत. आज संध्याकाळी प्रवाशांनी खचाखच भरून स्टेशनकडे जाणारी परिवहनची बस पोलीस ठाण्यासमोर येताच पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे ही बस एका बाजूला कलंडली. क्षणभर काय झाले हे प्रवाशांनाही समजेना. मात्र काही मिनिटांतच सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.