
अयोध्येतील राम मंदिरात मिळालेल्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित अपहाराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
भाजप-आरएसएस वर हल्लाबोल करताना काँग्रेसने म्हटले आहे की, अयोध्येतील राम मंदिरात देणग्यांची चोरी झाल्याचे खुलासे समोर आल्याने स्वतःला ‘हिंदुत्वाचे रक्षक’ म्हणवून घेणाऱ्यांचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, अयोध्येचा वापर आपल्या विभाजनाच्या राजकारणासाठी केल्यानंतर, भाजप-आरएसएसने सामान्य भाविकांच्या देणग्यांवर ‘दरोडा’ टाकला आणि त्यांच्या भावनांची क्रूर चेष्टा केली.
ते म्हणाले की, एकीकडे भाजपला कठोर एफसीआरए नियमांद्वारे नोंदणीकृत ट्रस्टवर नियंत्रण ठेवायचे आहे, तर दुसरीकडे आरएसएस सारख्या पूर्णपणे अनोंदणीकृत संस्थांना आपल्या देशातील मंदिरे ‘लुटण्याचे आणि फस्त करण्याचे’ पूर्ण स्वातंत्र्य आहे.
‘संघ परिवाराचा खरा हिंदू असण्याचा ढोंग आता आणखी उघडा पडला आहे, कारण सध्या नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये मंदिराच्या निधीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या ट्रस्टींची नावे देखील नाहीत. त्याऐवजी, उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसायटीने या मोठ्या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांना अडकवण्याऐवजी केवळ कनिष्ठ पदाधिकाऱ्यांचीच ओळख पटवली आहे’, असे वेणुगोपाल यांनी ‘एक्स’वर म्हटले.
STORY | Ram temple donation row: Congress demands SC-monitored probe, dissolution of Trust
Amid the row over alleged embezzlement of donations received at the Ram temple in Ayodhya, the Congress on Friday demanded a Supreme Court-monitored probe and the dissolution of the Shri… pic.twitter.com/woZx4Dqafi
— Press Trust of India (@PTI_News) June 26, 2026
काँग्रेस नेत्याने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली होणारी स्वतंत्र चौकशीच या ‘मंदिर लुटीची’ व्याप्ती समोर आणू शकेल.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी दावा केला आहे की, राम मंदिरात देणग्या आणि अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंची ‘भयानक लूट’ झाली आहे.
पत्रकारांशी बोलताना शुक्ला यांनी असा आरोप केला की, भगवान रामावर श्रद्धा असणाऱ्या लोकांकडून विशेषतः गावांमधून आणि समाजातील गरीब घटकांकडून गोळा केलेल्या देणग्यांचा अपहार करण्यात आला आहे आणि खऱ्या जबाबदार व्यक्तींऐवजी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे.
ते म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय एखादा खालचा कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून एवढी मोठी रक्कम कशी काय चोरू शकतो, हा तपासाचा विषय आहे.
काँग्रेस नेत्याने आरोप केला की, मंदिरात येणाऱ्या रोख रक्कमेची नोंद कमी दाखवली गेली आणि महिलांनी अर्पण केलेल्या दागिन्यांची योग्य नोंद ठेवली गेली नाही. ‘हा लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा विश्वासघात आहे’, असे ते म्हणाले.
शुकला यांनी दावा केला की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंदिर ट्रस्टवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा हेतू देणग्या व अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा राजकीय हेतूंसाठी वापर करण्याचा आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यात हस्तक्षेप करून कडक कारवाई करण्याचे आवाहन केले.
शुक्ला यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करण्याची आणि राजकीय व्यक्तींना हटवून त्याऐवजी संत, महंत आणि धार्मिक क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींचा समावेश करून या ट्रस्टची पुनर्रचना करण्याची मागणीही केली.
अयोध्येतील राम मंदिरात मिळालेल्या देणग्यांच्या कथित अपहारप्रकरणी एफआयआरमध्ये नाव असलेल्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला हा एफआयआर, उत्तर प्रदेश सरकारने या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालातील शिफारसींनंतर नोंदवण्यात आला आहे.





























































