
गेल्या वर्षी मे महिन्यात पहलगाम हत्याकांडाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईत देशाच्या लष्काराचे पाच आणि हवाई दलाचे एक असे एकूण सहा जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले होते. या मोहिमेनंतर सरकारने पहिल्यांदाच या सहा लष्करी जवानांची नावे जाहीर केली आहेत.
या वीर जवानांची नावे नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरिअलवर कोरली जातील.
सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार, लान्स नाईक दिनेश कुमार, अग्निवीर मुरली नाईक, हवालदार सुनील कुमार सिंग आणि हवाई दलाचे सार्जंट सुरेंद्र कुमार यांचा या कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानांमध्ये समावेश आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ मधील या वीरांची नावे २०२५ मधील विविध लष्करी मोहिमांदरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व सैनिकांच्या यादीसोबतच जाहीर करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ‘त्याग चक्र’ हे देशाच्या शूरवीरांना समर्पित आहे. यामध्ये ग्रॅनाइटच्या १६ वर्तुळाकार भिंतींचा समावेश आहे; स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे नाव, रँक आणि युनिट या भिंतींच्या विटांवर कोरलेली आहे.
आता, ‘ऑपरेशन सिंदूर’ चे हे सहा नायक देखील या स्मारकाचा कायमचा भाग बनतील.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला होता, ज्याचा बदला म्हणून हिंदुस्थानने गेल्या वर्षी ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले होते.
पाकिस्तानने याला तात्काळ प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सीमांवर हवाई चकमकी, ड्रोन हल्ले आणि जोरदार तोफगोळ्यांची लढाई सुरू झाली.
‘ऑपरेशन सिंदूर’ नाव दिलेल्या या लष्करी मोहिमेमागे एक मोठा प्रतीकात्मक संदेश होता.






























































