
>>डी. एस. फडके
राज्यात खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही प्रभावी कायदा किंवा सक्षम यंत्रणा अस्तित्वात नसल्यानेच कोचिंग माफियांचे जाळे पुण्यासह देशात पसरले आहे. याबरोबरच महाराष्ट्र खासगी शिकवणी वर्ग नियंत्रण कायदा मंजूर करण्याकरिता सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि मोठय़ा खासगी कोचिंग क्लास चालकांची नावे पेंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीत समोर आल्याने शिक्षण क्षेत्र हादरले. ‘जेईई’, ‘नीट’ यांसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी पर्सेटाईल मिळविण्याची हमखास हमी, अशा दैनंदिन जाहिराती केल्या जातात. त्याशिवाय विद्यार्थी आणि पालकांना वेगवेगळी आमिषे, स्वप्ने, सेवासुविधा, एसी वर्ग, शिक्षक, मोक्याच्या ठिकाणी क्लासेस, फी हप्ते अशा सवलती ऑफर केल्या जातात. तसेच ड्रेस कोड वगैरेद्वारा त्यांना आकर्षित केले जाते. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण यश मिळविण्यासाठी आश्वासन/प्रोत्साहन, मदत व आर्थिक लाभ अशी दिवास्वप्ने दाखवली जातात. असा सगळा गोलमाल करून हे खासगी कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. पैसा जमा करतात. पालक-विद्यार्थी यांची यथेच्छ लुटमार करतात. मनमानी पद्धतीने फीच्या नावाखाली पैसा लुटतात. पुण्यातील व राज्यातील खासगी क्लासेस व्यवस्थापक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, पालकांच्या भावनांशी खेळतात. स्पर्धा आणि इतर परीक्षांच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा काळा बाजार खासगी शिकवणी वर्गांनी मांडला आहे. खासगी शिक्षण क्षेत्रात सर्वसामान्य पालकांची खुलेआम आर्थिक पिळवणूक सुरू आहे. अनेक खासगी क्लासेस माफियांना काही महाविद्यालये, शिक्षण संस्था यांचा पाठिंबा आहे. त्यांच्यामार्फत आर्थिक लुटमार, फसवणूक, गैरप्रकार केले जात आहेत. त्यामुळे राज्यात तातडीने याविरोधात कठोर नियमावली आणि कायदा आणण्यात यावा. त्यासाठी सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे. राज्य सरकारने फक्त पोपटपंची करू नये.
पुण्यातील खासगी कोचिंग क्लासबाबतही कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पुणे मनपाने तातडीने खासगी जागामालक यांची पाहणी आणि सर्व्हे करावा, खासगी शिकवणी वर्गांचे सर्वेक्षण करावे हे अधिकार राज्य सरकारला आहेत. खासगी क्लासेस प्रतिबंध कायदा अमलात आणावा. पुण्यासाठी तर तो आवश्यकच आहे. कायदा आणि नीतिमत्ता न पाळता विद्यार्थी-पालकांची आर्थिक लूट करणारे खासगी क्लासेस तत्काळ बंद करावेत.





























































