
आयव्हरी कोस्टच्या निकोलस पेपेपुढे कुरासावने सपशेल लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. पेपेच्या दोन गोलांच्या मदतीने आयव्हरी कोस्टने कुरासाववर 2-0 ने विजय मिळवत विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रथमच प्रवेश केला.
आयव्हरी कोस्टसाठी हा सर्वात मोठा क्षण होता. त्यामुळे सामना संपल्यावर खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले. त्यांनी सांघिक फोटोसाठी मैदानावर गुडघे टेकले आणि प्रत्येकाने आकाशाकडे एक बोट उंचावले. हा या पश्चिम आफ्रिकन संघाच्या विश्वचषकातील पहिल्या बाद फेरीचा उत्सव होता. आयव्हरी कोस्टने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात इक्वेडोरला 1-0 ने हरवले, पण गटामधील दुसऱया सामन्यात त्यांना जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला.





























































