
जगाच्या तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा बिनसले आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठवणूक केंद्रासह किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हवाई हल्ले केले. यामुळे आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचे सायरन वाजण्याची चिन्हे आहेत. या ताज्या घडामोडींमुळे आधीच नाजूक असलेला युद्धबंदी करार मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणी सैन्याने व्यावसायिक जहाजांवर केलेले हे कृत्य विनाकारण पुकारलेले थेट आव्हान आहे. हा हल्ला म्हणजे चालू असलेल्या युद्धबंदी कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ओमानच्या आखातातून जाणाऱ्या मालवाहू जहाजावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही धडक कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.
https://t.co/CckXLJSpah pic.twitter.com/NoMQ7cNtN5
— U.S. Central Command (@CENTCOM) June 27, 2026
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजावर इराणने हल्ला केला होता. ओमानच्या दाहीत बंदरापासून आग्नेयेला 7.5 सागरी मैलांवर हा हल्ला झाला होता. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. इराणने व्यापारी जहाजावर केलेला ड्रोन हल्ला हा मूर्खपणाचा आणि आमच्यातील युद्धबंदी कराराचे थेट उल्लंघन करणारा आहे, अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी इराणला सुनावले होते.
इराणच्या बंदर शहरात मोठा स्फोट
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी उशिरा दक्षिण किनारपट्टीवरील सिरिक जवळील ताहेरुयेह बंदराच्या परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. अमेरिकेने डागलेल्या क्षेपणास्त्राच्या थेट आघातामुळेच हा प्रचंड स्फोट झाला असून, यात इराणच्या तळांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
‘हॉर्मुझ’मधील वाहतूक धोक्यात
इराण आणि अमेरिकेतील अंतिम शांतता करारासाठी चर्चा सुरू असतानाच इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली. इराणने त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही जहाजाला या खाडीत येण्यास किंवा जाण्यास सक्त मनाई केली आहे. इराणच्या या भूमिकेमुळे गुरुवारी जवळपास 42 पैकी निम्म्या जहाजांनी ओमानच्या किनारपट्टीवरून अनधिकृत दक्षिण मार्गाचा वापर केला. यामुळे भडकलेल्या इराणने एका जहाजाला लक्ष्य केले. यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि परिसरात शेकडो जहाजे आणि हजारो खलाशी अडकले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात मदतकार्य तात्पुरते स्थगित करावे लागले आहे.






























































