
भिवंडी तालुक्यातील आतकोली येथील डंपिंग परिसरात शासनाच्या अटी, शर्तींचे पालन न करता दररोज ठाणे पालिकेकडून 100 गाड्या कचरा डंप करून तो जाळला जात आहे. ठाण्याचा कचरा भिवंडीकरांच्या माथी मारला जात असल्यामुळे शेती, हवा, पाणी दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या जनसुनावणीत या डंपिंग ग्राऊंडला आतकोली, पिसे, वाकळे, वाशेरे, चिराडपाडा, आमणे, सापे परिसरातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला.
ठाणे महापालिकेच्या आतकोली येथील घनकचरा प्रकल्पाला नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन स्थानिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय कल्याणच्या वतीने अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच केएमडी बिझनेस क्लस्टर, सावद येथे जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी सोनज्या पाटील यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. गेल्या दीड वर्षांपासून आतकोली येथील डंपिंगवर बेकायदेशीरपणे कचरा आणून तो जाळला जात आहे. त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे श्वसन, फुफ्फुस, कॅन्सरसारखे आजार बळावत आहेत.
दुर्गंधीमुळे परिसरात रोगराई वाढली असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या. तर डंपिंगवरील दूषित पाण्यामुळे परिसरातील शेती नापीक होत असून दुर्गंधीमुळे उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम होऊन बेरोजगारी वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या जनसुनावणीत आतकोलीसह परिसरातील विविध ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, शेतकरी, नागरिक आणि डंपिंगविरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भातसा नदीचे पाणी दूषित
डंपिंग ग्राऊंडपासून 500 मीटरवर भातसा नदी आहे. याच नदीवर पिसे धरण आहे. त्यामुळे हे पाणी दूषित होण्याचा मोठा धोका आहे. एकीकडे समुद्री महामार्ग आणि आजूबाजूच्या परिसराचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे. असे असताना समुद्री महामार्ग शेजारीच असे आरोग्याला आणि विकासाला हानिकारक प्रकल्प का राबवले जात आहेत, असा सवाल करत हा प्रकल्प तात्काळ बंद करण्याची मागणी डॉ. घनश्याम पाटील आणि अॅड. संदीप जाधव यांनी जनसुनावणीत केली.





























































