
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या वर्षापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. मात्र या नव्या पुस्तकांची वेळेत छपाई न झाल्याने याचा जबरदस्त फटका या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला असून ११ दिवस उलटले तरी रायगड जिल्ह्यातील हजारो मुलांच्या हातात पुस्तकांचा पूर्ण संचच मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा अभ्यास बोंबलला आहे. शिक्षण विभागाच्या कुंभकर्णी कारभाराने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याच्या सरकारच्या घोषणेचा विचका झाला आहे.
समग्र शिक्षा अभियानांर्तगत जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खासगी अनुदान शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. रायगड जिल्ह्यात ३ हजार ३८ शाळांमध्ये २ लाख २५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने १० लाख ४९ हजार ४२७ पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारती विभागाकडे केली होती. यापैकी बहुतांश पुस्तके जिल्ह्याला मिळाली आहेत. परंतु अभ्यासक्रम बदलेल्या दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अद्यापि पुस्तकांचा संपूर्ण संच प्राप्त झालेला नाही. याबाबत वारंवार विचारणा करूनही शाळा व्यवस्थापनांकडून ठोस माहिती मिळत नसल्याने पालक मेटाकुटीला आले आहेत.
सांगा, अभ्यास करायचा कसा?
बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके सरकारने वेळेत छपाई करून घेणे गरजेचे होते. मात्र शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. पुस्तकांचा संपूर्ण संच न मिळाल्यामुळे पनवेल, उरण, अलिबागसह अनेक तालुक्यांतील विद्यार्थी शाळेत नित्यनियमाने जातात खरे, पण हातात पुस्तकेच नसल्याने तशीच घरी येतात. त्यांचा अभ्यास काय घ्यायचा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. सरकारच्या आश्वासनांवर आम्ही पुस्तके घेतलेली नाहीत. पण या भोंगळ कारभारामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांनी अभ्यास कसा करायचा, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व पालक निलेश पाटील यांनी केला आहे.
शिक्षणाधिकारी फोनच घेईनात
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांना यासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांत किमान चार वेळा संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांनी फोनच घेतला नाही. आश्चर्य म्हणजे शिक्षण विभागाचे अन्य अधिकारीदेखील उघडपणे यावर बोलण्यास नकार देत असल्याने या विभागातील सावळा गोंधळाचा फटका मुलांना बसत आहे.





























































