
टीडीआरच्या आडून आणखी १४ एकर भूखंड लाटण्याचा डाव असून वादग्रस्त कोठारी कंपाऊंडमधील सर्व अनैतिक धंदे विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वी उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पालिका आयुक्तांकडे केली आहे. गेली अनेक वर्षे या ठिकाणी हुक्का पार्लर, पब, जुगार, वेश्याव्यवसाय सुरू असल्यामुळे ठाणे शहराचे नाव बदनाम होत आहे. पालिकेने हातोडा टाकला नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोठारी कंपाऊंडमध्ये घुसतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
कोठारी कंपाऊंड गेल्या काही वर्षांपासून गाजत असून तेथे मोठ्या प्रमाणावर अनैतिक धंदे चालतात. त्यामुळे परिसरातील नागरिकही हैराण झाले आहेत. याबाबत पालिकेच्या महासभेत अनेकदा चर्चा झाली असून कोणतीही ठोस कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर–मानपाडामधील १९४ एकर वनजमीन ठाणे पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
२,८०० कोटींचा टीडीआर देण्याची प्रक्रिया ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. मात्र १४ एकरचा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
डी. दयाभाई अँड कंपनीला टीडीआर देऊ नये, असे पत्र वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी ११ जून रोजी दिले आहे. तसेच विशेष अनुमती याचिका दाखल करण्याचेही कळवले आहे. मग गेले १६ दिवस हे नवनाट्य झोपले होते का, असा सवाल करण्यात आला आहे.
१९४ एकरपैकी १४ एकरवर तरणताईला विघडवणारे सर्व अनैतिक धंदे सुरू असून त्यातून भाडे घेऊन कोठारी–डी. दयाभाई गब्बर होत आहेत. हे भूखंड विकून त्यातून मालामाल होण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.





























































