अलिबागच्या फुफादेवीचा पाड्यावर यमदूताचा दबा, २५ घरांवर दरडींची टांगती तलवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्याच पावसात अलिबाग तालुक्यातील फुफादेवीचा पाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये एक घर थोडक्यात बचावले. गावातील पंचवीस घरे दरडप्रवण क्षेत्रात असून नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. ग्रामस्थांच्या डोक्यावर दरडींच्या रूपाने अक्षरशः यमदूत दबा धरून आहे. सरकारी अनास्थेमुळे येथे आवश्यक उपाययोजनांची वानवा आहे. यामुळे फुफादेवीचा पाड्यावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

२१ व २२ जुलै २०२१ रोजी महाड येथे तळिये गावात दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर राज्य शासनाने रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण गावांच्या उपाययोजनासाठी मोठमोठ्या घोषणा – केल्या. मात्र या सर्व घोषणा पावसात वाहून गेल्या. एकही ठोस काम झालेले नाही. चार दिवसांपूर्वी पावसामुळे फुफादेवीचा पाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली. फुफादेवीचा पाडा गावाच्या डोंगरपायथ्याशी जवळपास पंचवीस घरे असून या घरांना दरडीपासून धोका आहे. या दरडीसह आलेला एक भलामोठा दगड संरक्षक पिचिंग भेदून थेट घराच्या – कंपाऊंडमध्ये येऊन पडला. सुदैवाने दगडामुळे घराचे कोणतेही नुकसान झाले – नाही. मात्र यामुळे फुफादेवीचा पाडा गावाला दरडीपासून धोका असल्याचे अधोरेखित झाले आहे. फुफादेवीचा पाडा येथे शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यातील दरडग्रस्त गावे

– रायगड जिल्ह्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेली ३९२ गावे असून सर्वात जास्त १४० गावे पोलादपूर तालुक्यात आहेत. तर महाड १२१, रोहा २०, म्हसळा १४, माणगाव २२, पनवेल ३, खालापूर १२, कर्जत ५, सुधागड ९, श्रीवर्धन १२, तळा ३, अलिबाग ९, मुरुड ९, पेण १३ गावे दरडग्रस्त आहेत.

– २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील दासगाव, रोहन, जुई, कोंडिवते, अप्पर तुडील या गांवांसह पोलादपूर तालुक्यातील कुडपण, कोंढवी, कोतवाल या गावांमध्ये दरडी कोसळून ३०० जणांचा मृत्यू.

– २२ जून २०१५ रोजी नेरळ मोहाची वाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू.

– २१ व २२ जुलै २०२१ रोजी महाड येथे तळिये गावात दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे भूस्खलन होऊन ५ जण तर साखर सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेत ६ जण दगावले.