
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसी) निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वसईत पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. वसईतील विरार पूर्व येथील भाजप कार्यालयात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बविआचे नगरसेवक निपाद चौरे व प्रशांत राजूत यांनी पोलिसांसह तेथे धाड टाकली. या कारवाईदरम्यान रोख रक्कम असलेली 21 पाकिटे जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या पाकिटांमध्ये 5 हजार, 37 हजार आणि 38 हजार अशा रकमा असल्याचे सांगण्यात आले. ही सर्व पाकिटे पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पैसे नेमके कोणाला वाटण्यासाठी ठेवले होते याचा तपास सुरू आहे.
भाजपचे विरार शहराध्यक्ष मनीष वैद्य यांनी हे पैसे एका व्यावसायिकाचे असल्याचा दावा केला. टीडीसी बँकेच्या निवडणुकीशी या पैशांचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले.
टीडीसी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 27 जून रोजी होणार असून, 21 पैकी 10 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे.
विधानसभेच्या वेळीही पैसे वाटप
बहुजन विकास आघाडीने दावा केला की, यापूर्वी विधानसभा निवडणुकीदरम्यानही अशाच प्रकारे पैसे वाटपाचा प्रकार समोर आला होता. त्यावेळीही स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. टीडीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशाच प्रकारचा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप करण्यात आला.





























































