टीम इंडियाच्या खेळाडूंची आयपीएलची नशा उतरली; लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या आयर्लंडने पाजले पराभवाचे पाणी, मालिका विजयाचे स्वप्न भंगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 चा बादशहा असणाऱया हिंदुस्थानच्या संघाला आयर्लंडने पराभवाचे पाणी पाजून सर्वांना धक्का दिला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंची आयपीएलची नशा उतरल्याचे पाहायला मिळाले. दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडने पहिल्या सामन्यात 34 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या पराभवासह हिंदुस्थानचे मालिका विजयाचे स्वप्न तर भंगलेच आहे. कारण ही दोन टी 20 सामन्यांचीच मालिका आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्याची नामुष्की ओढावली आहे.

हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले. आयर्लंडने 20 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. आयर्लंडची सुरुवात खराब झाल्यानंतर कर्णधार लॉर्कन टकरने 36 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा करून संघाचा डाव सावरला. त्याला गॅरेथ डेलानीने 49 धावांची झुंजार खेळी करून उत्तम साथ दिली. त्यामुळे आयर्लंडला 182 धावांपर्यंत मजल मारता आली. हर्षित राणा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या, तर अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येक 2 फलंदाजांना बाद केले.

आयर्लंडने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची तारांबळ उडाली. हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज आयर्लंडच्या गोलंदाजांपुढे तग धरू शकले नाहीत. आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करणारे संजू सॅमसन 5 तर ईशान किशन अवघी 1 धाव करून तंबूत परतला. तसेच, तिलक वर्मा, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर या दिग्गज फलंदाजांनी आयर्लंडपुढे सपशेल नांगी टाकली. अभिषेक शर्मा याने 20 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली.

अभिषेक वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला तग धरता आला नाही. परिणामी हिंदुस्थानचा संपूर्ण संघ अवघ्या 148 धावांत तंबूत परतला. आयर्लंडच्या मॅथ्यू हॉलार्ड याने 4 षटकांत 28 धावा देत 3 गडी बाद केले, तर मॅथ्यू हम्प्रेयजने 3.5 षटकांत 38 धावा देत 3 विकेट्स पटकावले. जय चंद्रने 4 षटकांत 26 धावा देत 2 फलंदाजांना गारद केले. हिंदुस्थान आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा आणि अखेरचा टी-20 सामना रविवारी होणार आहे.