
दक्षिण मुंबईतील हँकॉक पुलाचे बांधकाम मागील दहा वर्षांपासून रखडले आहे. आतापर्यंत फक्त चाळीस टक्केच काम पूर्ण झालेले आहे. या पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे रहिवाशांना रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. त्यात वीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पुलाचे काम रखडल्याने बांधकामाचा खर्च तब्बल 61 कोटी रुपयांनी वाढल्याचा आरोप काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी विधानसभेत केला. त्यावर शासनाने याची दखल घेण्याचे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले.
2015 मध्ये मुंबई महानगरपालिकेने या पुलाला धोकादायक जाहीर करून तोडायची नोटीस दिली होती. जानेवारी 2016 मध्ये हा धोकादायक पूल तोडून टाकण्यात आला. या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली. ऑगस्ट 2022 मध्ये या पुलाच्या दोन लेन सुरू झाल्या, पण 2016 ते 2022 या कालावधीत या पुलावर पंधरा ते वीस लोकांचा रेल्वे रुळ ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला. 2018मध्ये मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये लेखी स्वरूपात हमी दिली होती की, 2019मध्ये हा पूल पूर्ण होईल. पण आतापर्यंत फक्त चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. साठ टक्के काम अपूर्णच आहे याकडे अमीन पटेल यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे लक्ष वेधले.
या पुलाच्या बांधकामासाठी तेव्हा 14 कोटी रुपये लागणार होते. पण आतापर्यंत 75 कोटी रुपये खर्च झाले आहेत असा आरोप त्यांनी केला. आता या वर्षीचा जून महिना संपत आला आहे, पण तरीही या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे कोणतीही योजना नाही. तरीही मुंबई महानगरपालिका, रेल्वे किंवा म्हाडावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मुंबादेवी आणि भायखळा मतदारसंघाला जोडणारा हा पूल आहे. रेल्वे, महापालिका, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित एक बैठक आयोजित करून माझ्यासह भायखळा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर यांना या बैठकीला आमंत्रित करून या पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी अमीन पटेल यांनी केली.





























































