
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात एकामागून एक त्रुटी समोर येत आहेत. आधी मुख्य जलवाहिनी आणि व्हॉल्वला गळती, त्यानंतर जॅकवेलला गळती असे प्रकार समोर आलेले आहेत. तर दोन दिवसांत झालेल्या पहिल्याच पावसांत नक्षत्रवाडीतील नवीन पंपहाऊस गळायला लागले आहे. त्यामुळे दोन दिवसापासून गळती दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘ऐतिहासिक शहर’ अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी २७४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मागील चार-पाच वर्षांपासून योजनेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) जीव्हीपीआर कंपनीला कंत्राट दिलेले आहे. कंत्राटदार कंपनीने जायकवाडी धरणापासून नक्षत्रवाडीपर्यंत ३९ किमी. लांबीची २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकली. धरणात जॅकवेलची उभारणी केली. नक्षत्रवाडी येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले. या योजनेद्वारे शहराला ४०० एमएलडी पाणी देण्याचे नियोजन आहे. काम लांबत असल्याने, पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर त्यानुसार कामाला वेग देण्यात येत आहे.
जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर सायफन पद्धतीने धरणातील पाणी उपसा करून जॅकवेलमध्ये घेण्यात आले. त्यानंतर हे पाणी नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात आले. यादरम्यान मुख्य जलवाहिनीला गळती लागली, व्हॉल्व फुटल्याचे प्रकार घडले. जलवाहिनीला आधार देण्यासाठी बांधलेल्या चेअर्सला तडे गेले, तेही दुरुस्त केले. जॅकवेलमधून उपसा सुरू असताना, काही ठिकाणी लिकेज होत असल्याचे दिसून आले. त्याचीही दुरुस्ती केली. जॅकवेलमध्ये धरणातील पाण्यासोबत मातीही येत आहे. भविष्यात जॅकवेलमध्ये साचलेला हा गाळ काढणार कसा, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित आहे. त्या पाठोपाठ आता नवीन पाणी योजनेसाठी नक्षत्रवाडी येथे बांधण्यात आलेल्या नवीन पंपहाऊसला गळती लागली. स्लॅब गळत असल्याने पंपहाऊसमधील इलेक्ट्रिक पॅनलवर पाणी पडत आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच जायकवाडी येथे जॅकवेलवर बांधलेले शेवटी गळू लागले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराचा वाढीव पाणीपुरवठा बंद झाला आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
योजना ठरतेय ‘ऐतिहासिक’!
नवीन योजनेचे पाणी शहराला देण्यास सुरू केले नाही तोच वेल्डिंग निखळल्याने जलवाहिनीला लिकेज, जॅकवेलजवळील जलवाहिनीच्या चेअर्सला तडे, जॅ कवेलमधून गळती… अशा एकामागून एक त्रुटी या नवीन योजनेत उघड होत आहेत. आता पावसाने नक्षत्रवाडीतील पंपहाऊसच्या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. विशेष म्हणजे हा पाऊस काही जोरदार झालेला नाही. मात्र त्यातही पंपहाऊसच्या स्लॅबला गळती लागली. गुरुवारी आणि शुक्रवारी स्लॅबची गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकामागून एक त्रुटी समोर येत असल्याने, ऐतिहासिक शहरातील ही नवीन पाणीपुरवठा योजनासुद्धा ‘ऐतिहासिक’ ठरत असल्याची चर्चा होत आहे.
आयुक्तांनी काढली खरडपट्टी
नवीन योजनेचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळताच मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी आज शुक्रवारी नक्षत्रवाडी येथे जाऊन पंपहाऊसला लागलेल्या गळतीची पाहणी केली. जीव्हीपीआर कंपनी आणि मजीप्राच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘पंपहाऊसला गळती लागल्याचे कळवले का नाही? कामाचे पितळ उघडे पडत चालले. किती दिवस लागणार दुरुस्तीला?’ असे सवाल करीत मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.






























































