
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हिंदुस्थानचे सहा जवान शहीद झाले होते. या जवानांची नावे पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आली आहेत. यानंतर आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी त्यांना प्रचंड ट्रोल करत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ देशाचे किती नुकसान झाले याबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता. हा विषय संसदीय अधिवेशनामध्येही उपस्थित करण्यात आला होता. याला उत्तर देताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नाही, असे म्हटले होते. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदेमध्ये खोटे बोलले असा आरोप नेटकरी आणि विरोधक करत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये एकही सैनिक शहीद झाला नसल्याचे धादांत खोटे संसदेत बोलले गेले. परंतु, आजच समोर आलेल्या एका अधिकृत बातमीनुसार, या ऑपरेशन दरम्यान आपले 6 वीर जवान शहीद झाले असून त्यांच्या नावांची संपूर्ण यादीच जाहीर झाली आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांबद्दल असे असत्य बोलून त्यांचा त्याग आणि सर्वोच्च बलिदान नाकारणे, हा थेट त्यांच्या हौतात्म्याचा आणि शौर्याचा घोर अपमान आहे. पण देशासाठी प्राणांचे मोल काय असते. ही गोष्ट संघी लोकांना कुठे समजणार, असा टोला आरजेडी नेत्या प्रियंका भारती यांनी लगावला.
संसद के भीतर झूठ बोला गया की ऑपरेशन सिंदूर में कोई भारतीय सैनिक शहीद नहीं हुआ।
आज खबर आई, ऑपरेशन सिंदूर के दौरान 6 भारतीय सैनिक शहीद हुए और सबके नामों की सूची आई है।
शहीदों पर झूठ बोल कर उनके त्याग और बलिदान को ग़ायब कर देना ,उनकी शहादत का अपमान है।
ये बात संघी कहाँ समझेंगे! pic.twitter.com/HibEHEae2U
— Priyanka Bharti (@priyanka2bharti) June 27, 2026
काय आहे व्हिडीओ?
व्हिडिओमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत म्हणतात, “तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की, या ऑपरेशनमध्ये आमच्या शूर सैनिकांना काही इजा किंवा नुकसान झाले आहे का? तर त्याचे उत्तर आहे, नाही!”
पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेली मोहीम
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटकांसह एका स्थानिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने 6 आणि 7 मे च्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकव्याप्त कश्मीरमध्ये हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात 4 दिवस हवाई युद्ध भडकले होते. अखेर पाकिस्तानने गुडघे टेकवून युद्धबंदीची विनंती केली.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहा जवान शहीद, वर्षभरानंतर शहिदांच्या हौतात्म्याची सुवर्णाक्षरात नोंद
शहीद जवानांची नावे वर्षभरानंतर उघड
ऑपरेशन सिंदूरमध्ये सहा जवान शहीद झाले होते. त्यापैकी दोघांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रायफलमॅन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीरचक्र तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना मरणोत्तर वायू सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. लान्स नायक दिनेश कुमार (5 फिल्ड रेजिमेंट), एव्हिएटर अग्निवीर मूड मुरली नायक (851 लाईट रेजिमेंट), सार्जंट सुरेंद्र कुमार (39 विंग, हवाई दल), सुभेदर मेजर पवन कुमार (10 इन्फण्ट्री ब्रिगेड), रायफलमॅन सुनील कुमार (4 जम्मू-कश्मीर लाईट इन्फण्ट्री), हवालदार सुनील कुमार सिंह (237 फिल्ड वर्कशॉप कंपनी) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशासाठी प्राणांची आहुती दिली.


























































