
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागातील कनिष्ठ अवेक्षक रिक्त पदे लवकरच भरण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे ही रिक्त पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेतील आरोग्य खात्याकडून कनिष्ठ आवेक्षक पदे भरण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून प्रलंबित होती. यावर तोडगा काढण्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर व चिटणीस संजय वाघ यांच्या वतीने उपयुक्त सामान्य प्रशासन यांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची दखल घेत उपायुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱयांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत येत्या महिनाभरात कनिष्ठ अवेक्षकांची रिक्त पदे भरण्याचे मान्य करण्यात आले. या मागणीसाठी जिवराज परमार, किरण पाटील, मुशीर शेख, निशांत पाटील, श्याम खोब्रागडे यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रशासनाकडून रिक्त पदे संघटनेच्या मागणीनुसार सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे येत्या महिनाभरात भरती केली जाणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे संघटना व सर्व कर्मचाऱयांनी प्रशासन व आरोग्य विभागाचे आभार मानले.





























































