
वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी टाकून एका 51 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. आर्थिक चणचणीतून व्यावसायिकाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भावेश मजेठिया (51) असे त्या व्यावसायिकाचे नाव होते. ठाण्यात राहणारे भावेश हे व्यावसायिक होते. आज टॅक्सीने ते वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आले. मळमळल्यासारख होतेय असे म्हणत त्यांनी टॅक्सी बाजूला उभी करण्यास सांगितली. त्यानुसार चालकाने टॅक्सी बाजूला घेताच भावेश यांनी बाहेर येऊन थेट समुद्रात उडी टाकली. हा प्रकार कळताच वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन भावेश यांचा शोध सुरू केला. मात्र भावेश यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.





























































