
आफ्रिकेच्या मोरोक्कोने युरोपियन बलाढय़ नेदरलँड्सला धक्का देत फिफा वर्ल्ड कपच्या आणखी एका महासंग्रामात इतिहासाची पुनरावृत्ती केली. अतिरिक्त वेळेनंतर 1-1 अशी बरोबरी झालेल्या या रोमहर्षक लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्कोने 3-2 असा थरारक विजय मिळवत नेदरलँड्सला विश्वचषकाच्या राऊंड ऑफ 32 मधून बाहेरचा रस्ता दाखवत 32 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा हिशेबही चुकता केला.
… अशी झाली गोल बरोबरी
सामन्याच्या 72 व्या मिनिटाला क्रिसेन्सिओ समरव्हिलच्या पासवर कोडी गाक्पोने गोल करत नेदरलँड्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र सामना संपत असताना 91 व्या मिनिटाला चेम्सदीन ताल्बीच्या लांब क्रॉसवर इस्सा डिओपने शानदार हेडर करत बरोबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि अखेर सामना पेनल्टी शूटआऊटकडे गेला.
बुनूचा करिष्मा, सैबारीचा विजयी गोल
पेनल्टी शूटआऊटच्या चार फेऱ्यांनंतर दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीत होते. त्यानंतर नेदरलँड्सच्या क्रिसेन्सिओ समरव्हिलचा फटका मोरोक्कोचा अनुभवी गोलरक्षक यासिन बुनूने डाव्या हाताने अप्रतिमरीत्या रोखला आणि सामन्याचे पारडे फिरवले. त्यानंतर निर्णायक क्षणी इस्माईल सैबारीने चेंडू गोलपोस्टच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात अचूक मारला. नेदरलँड्सचा गोलरक्षक बार्ट व्हर्ब्रुगेन विरुद्ध दिशेला झेपावल्याने सैबारीचा फटका थेट जाळ्यात विसावला आणि मोरोक्कोच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झाले.
सामन्यातील ठळक घडामोडी
कोडी गाक्पोने विश्वचषकातील आपल्या कारकीर्दीतील सहावा गोल नोंदवला. विश्वचषकात किमान सहा गोल करणाऱ्या नेदरलँड्सच्या अवघ्या सहा खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला.
नेदरलँड्सने आतापर्यंत 11 विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून प्रत्येक वेळी किमान राऊंड ऑफ 16 पर्यंत मजल मारली होती, मात्र यावेळी त्यांची मोहीम राऊंड ऑफ 32 मध्येच संपुष्टात आली.
1994 च्या विश्वचषकात नेदरलँड्सने मोरोक्कोचा 2-1 असा पराभव केला होता. तब्बल 32 वर्षांनंतर मोरोक्कोने त्या पराभवाचा हिशेब चुकता करत सूड उगवला.






























































