रोज दहा तास वीज खंडित होतेय,बेस्टने दखल का घेतली नाही?विधानसभा अध्यक्षांची कठोर भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत आहे. मुंबईसारख्या शहरात विजेचा हा खेळखंडोबा सर्वच बाबतीत नुकसानकारक ठरत आहे. विजेच्या या लपंडावाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बेस्ट प्रशासनाने याची दखल का घेतली नाही? असा जाब विचारला. तसेच याप्रश्नी चर्चेसाठी उद्या आपल्या दालनात विशेष बैठक बोलवली. त्यात तोडगा न निघाल्यास बेस्ट महाव्यवस्थापकांना सभागृहात हजर राहण्याची सूचना करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस आमदार अमीन पटेल आणि आमदार तमिल सेल्वन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनीही भाग घेतला. मुंबईतील परळ, गिरगाव, प्रतीक्षानगर, शीव-कोळीवाडा आदी भागांमधील नागरिक ऐन उन्हाळ्यात सातत्याने वीज खंडित होत असल्याने हैराण झाले आहेत. दक्षिण मुंबईत तर वीज पुरवठय़ात बिघाड झाल्याच्या 1200 तक्रारी प्रलंबित आहेत. फोन केल्यानंतरही उचलले गेले नाहीत. दुरुस्ती केंद्रांवर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि दुरुस्ती साहित्याची कमतरता याकडेही या आमदारांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईत नवीन सब-स्टेशन, उच्च क्षमतेच्या केबल्स आणि पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब अत्यंत खेदजनक

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथेच रोज आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर ही बाब मुंबईच्या प्रतिष्ठsसाठी अत्यंत खेदजनक असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. देशभरात सध्या पर्यावरण बदलांबाबत उपाययोजना सुरू असतानाच बेस्ट आणि महानगरपालिकेने त्यासंदर्भात काहीच का केलेले नाही? वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे नेटवर्क सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पावले का उचलली नाहीत, असा जाबही त्यांनी विचारला.