सिग्नलमुळे वाचला कोसळलेल्या फांदीपासून अनेकांचा जीव, बाजीराव रस्त्यावर टळले अघटित; अवघ्या दोन सेकंदांनी रोखला काळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिग्नलचा लाल दिवा लागतो अन् वाहतूक थांबते ना थांबते, तोच झाडाची भलीमोठी फांदी कडकड आवाज करत रस्त्यावर कोसळते…. अवघ्या दोन ते तीन सेकंदांची ही वेळ; पण याच वेळेने बाजीराव रस्त्यावर आज काळाला रोखत ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या उक्तीचा प्रत्यय दिला.

हा प्रसंग आहे बाजीराव रस्त्यावरील अन्ने सभागृहाजवळील, वेळ दुपारी ३ वाजून २२ मिनिटांची. येथे असलेल्या एका अवाढव्या झाडाची फांदी दुपारी पावसामुळे वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर कोसळली. फांदी कोसळण्याआधी केवळ दोन सेकंदांपूर्वी पुरम चौकातील सिग्नलचा लाल दिवा लागला. त्यामुळे सारसबागेकडून येणारी वाहतूक थांबली.
ती वाहतूक सुरू असती तर दुर्दैवाने मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या दुकानातील कामगारांसह व्यावसायिकांनी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच जवानांनी पोहोचून झाडाची फांदी बाजूला काढली. यादरम्यान साधारपणे १५ ते २० मिनिटे बाजीराव रस्त्यावरील वाहतूक टिळक रस्त्याने वळवण्यात आली. त्यामुळे या रस्त्यावर स.प. महाविद्यालयापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, संततधार पावसाने मध्यवर्ती भागासह उपनगरात वाहतुकीचा वेग मंदावला होता. विशेषतः संध्याकाळी सहा वाजल्यानंतर वाहतूककोंडीत भर पडली होती.

रिक्षाचालकाचे नशीब बलवत्तर!

या घटनेवेळी अत्रे सभागृहासमोरून एक रिक्षाचालक बाजीराव रस्त्याकडे निघाला होता. त्यावेळी एका पैसेंजर तरुणीने आवाज दिल्याने रिक्षाचालक थांबला आणि काही क्षणातच पुढे झाडाची फांदी कोसळली, डोळ्यांसमोर कडकडत कोसळलेल्या फांदीमुळे रिक्षाचालकाला समोर आपला मृत्यूच दिसला. तरुणीने त्याक्षणी आवाज दिला नसता तर…? पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून या रिक्षाचालकावरील अघटित टळले.