एसटीचे 11 अधिकारी निलंबित, कर्मचाऱ्यांचे अघोषित काम बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशांची गैरसोय, एसटीचे नुकसान, खोटे रेकॉर्ड आदी बाबींचा ठपका ठेवून एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील अकरा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणी शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी अघोषित काम बंद आंदोलन केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

एसटीच्या नाशिक विभागातील गैरकारभाराच्या अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी महामंडळाच्या विशेष भरारी पथकाने या तक्रारींची चौकशी केली. सर्व आगार तसेच कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली, अहवाल तयार केला. संबंधितांनी महामंडळाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले. आवश्यक नोंदी न करता खोटय़ा नोंदी केल्या. आर्थिक फायद्याच्या उपाययोजनांबाबत निष्काळजीपणा केला, प्रवाशांना सोयीसुविधा न देता त्यांची गैरसोय केली, आवश्यक सूचनांचे उल्लंघन केले, वारेमाप खर्च करून मनमानी केली, स्थानिक खरेदीत अनियमितता केली आदी गंभीर प्रकार चौकशीत समोर आले आहेत. प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता, विभागीय वाहतूक अधिकारी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, लेखा अधिकारी, विभागीय लेखा अधिकारी, विभागीय भांडार अधिकारी, विभागीय कर्मवर्ग अधिकारी, विभागीय अभियंता, आगार व्यवस्थापक या पदांवरील अकरा अधिकाऱ्यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे. यास प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांनी दुजोरा दिला. या प्रकारानंतर शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी अघोषित काम बंद आंदोलन केले होते. निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांनीच कर्मचाऱ्यांमार्फत हे दबावतंत्र अवलंबिले, अशी चर्चा आहे.