
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत घडलेल्या दुर्घटनांची फिदीफिदी हसत टिंगल केल्याचे समोर आले आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे आणि हाच संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप आमदारांच्या बेताल विधानांवर आणि असंवेदनशीलतेवर फडणवीस यांनी बाळगलेल्या मौनावर राज ठाकरे यांनी बोट ठेवले. चुकीचे वागणाऱ्यांना तातडीने शासन करा, अन्यथा तुमची प्रतिमा फक्त स्वकीयांच्या चुका पाठीशी घालणारा भाऊ अशीच राहील, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे? आणि तुम्ही तू पसरू देताय? असा सवाल राज ठाकरे यांनी फडणवीस यांना विचारला आहे.
ते पुढे म्हणाले की, देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे!
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला…— Raj Thackeray (@RajThackeray) July 4, 2026
तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही. तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच असे बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली
काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं… मुंबईकरांचा जीव गेला अन् भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम असंवेदनशीलपणे हसत होते pic.twitter.com/XHNUR6doir
— Saamana Online (@SaamanaOnline) July 3, 2026




























































