
हिंदुस्थान आणि इंग्लंडच्या पुरुष संघामध्ये शनिवारी पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाला या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. अय्यरने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हिंदुस्थानच्या पराभवाची हॅटट्रिक झाली आहे. याआधी आयर्लंडने हिंदुस्थानला दोन सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश दिला होता. आता हिंदुस्थान इंग्लंडशी दोन हात करत असून तिसरा सामना 7 जुलैला खेळला जाणार आहे. तत्पूर्वी शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान दाखवण्यात आलेल्या कंडोमच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 क्रिकेट सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान कंडोमची जाहिरात दाखवण्यात आली. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी यावर तीव्र आक्षेप घेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर नेटिझन्समध्ये दोन गट पडले असून, इंटरनेटवर यावरून मोठी चर्चा रंगली आहे.
हा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना लहान मुले आणि कुटुंबे एकत्र बसून थेट पाहत आहेत. अशा वेळी स्क्रीनवर ड्युरेक्स सारख्या प्रौढांसाठीच्या उत्पादनाची जाहिरात येणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? असा सवाल करत आझाद यांनी आपल्या पोस्टमध्ये बीसीसीआयलाही टॅग केले आहे. त्यांची ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली असून, याला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 700 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
Children are watching live the international T20 match between India versus England being played at Old Trafford. Isn’t it a shame that an adult advertisement of Durex comes on the screen.@BCCI to take note.
— Kirti Azad (@KirtiAzaad) July 4, 2026
दरम्यान, या मुद्द्यावर युजर्स दोन गटांमध्ये विभागलेले पाहायला मिळाले. आझाद यांच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या एका युजरने लिहिले, हे अगदी खरे आहे. मलाही कुटुंबासोबत सामना पाहताना संकोच वाटला आणि मी सामना पाहणे बंद केले. तर दुसऱ्या एकाने म्हटले की, प्रौढ असूनही पालकांसोबत अशा जाहिराती पाहणे अवघडल्यासारखे होते.
दुसरीकडे, अनेक युजर्सनी या जाहिरातींचे समर्थन केले आहे. एका युजरने लिहिले, देशाची लोकसंख्या पाहता सुरक्षित लैंगिक संबंध आणि गर्भनिरोधाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांमध्ये खेळाच्या माध्यमातून ही जनजागृती करणे योग्यच आहे. तर आणखी एका पालकाने लिहिले, माझ्या वडिलांनी आम्हाला वयाच्या 10 व्या वर्षीच गर्भनिरोधकांबद्दल सांगितले होते. किशोरवयीन मुलांना कुटुंब नियोजनाची माहिती असणे ही काळाची गरज आहे.




























































