
भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि भाजप अल्पसंख्याक सेलचे युवा प्रदेश उपाध्यक्ष साहिल काजी याला ओडिशामध्ये कोट्यवधी रुपयांच्या गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत या प्रकरणावरून राम शिंदे यांच्यासह भाजपला धारेवर धरले. साहिल काजीकडून सुमारे एक कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून तो गेल्या दोन वर्षांपासून या बेकायदेशीर व्यवसायात सक्रिय असल्याची कबुली त्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर राम शिंदे हे आपले राजकीय नेटवर्क वापरून या ड्रग्ज तस्कराला वाचवण्यासाठी आटापिटा करत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच कायद्याचे धडे देणारे राज्याचे मुख्यमंत्री आता या प्रकरणात काय भूमिका घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रा. राम शिंदे सरांची आणि गुंडांची गट्टी अतिशय घट्ट आहे. आता त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि भाजपा अल्पसंख्यांक सेलचा युवा प्रदेश उपाध्यक्ष असलेला साहिल काजी ओडीसामध्ये गांजाची तस्करी करताना पकडला असून, त्याच्याकडं सुमारे कोटभर रुपयांचा गांजा जप्त केला. तसंच गेली दोन वर्षे तो… pic.twitter.com/hy1PoNRUeu
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 5, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा संदर्भ देत रोहित पवार म्हणाले की, कर्जत-जामखेडमधील सोसायट्यांचे ठराव मिळवण्यासाठी निवडणुकीत जो पैशांचा पाऊस पाडला गेला, त्यासाठीचे काळे ढग याच गांजा तस्कराच्या माध्यमातून तर आले नव्हते ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, जर आता विधानपरिषदेचा कोणी सदस्य सभागृहात ड्रग्जचा मुद्दा मांडणार असेल तर, त्यांनी उगाच वेळ वाया घालवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.



























































