
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील लुटीच्या निषेधार्थ दादरमध्ये आयोजित ‘रामरक्षा’ आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मुसळधार पावसातही रामभक्त आणि शिवसैनिकांच्या अलोट गर्दीला संबोधित करताना, “ही पावसात पेटलेली ठिणगी आहे, आपण सर्वांनी एकजुटीने या चोरांना तडीपार करूया,” असा घणाघाती इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत, राम मंदिरातील कारभारावरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, याच एका वाक्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशातील तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटलं होतं. तो आवाज, तो क्षण आजही आपल्या डोळ्यांसमोर आहे. आपण कट्टर, कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही भोळे, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल, तर मी परवाच म्हणालो आहे की, ‘अब हिंदू माफ नही करेगा’. देशाची सत्ता घेताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या गेल्या. ‘मंदिर वहीं बनाएंगे’. पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं, मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल. शिलापूजन असेल तर, शिलापूजन केलं. रथयात्रा असेल तर, रथयात्रेत सामील झाले. कारसेवा असेल तर, अयोध्येत जाऊन कारसेवा सुद्धा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं. अनेकांचे जीव गेले. त्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचितच एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले. दंगली झाल्या. तेव्हा देशातला फक्त एकच मर्द उभा राहिला होता हिंदूंच्या पाठी, ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, हिंदू आधाराच्या शोधात होता. त्या वेळेला हाच शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. याचा गैरफायदा घेतला गेला. नको ते लोक सत्ता भोगत आहेत आणि हिंदू आजही भरडला जातोय. बारा वर्षे होऊन गेली, आज ज्यासाठी आपण मेहनत केली, ती व्यक्ती पंतप्रधानपदावर बसली आणि बसल्यानंतर कट्टर, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफझलखानी विडा त्यांनी उचलला. का उचलला? कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना देशात एकच शिवसेना अशी आहे की, जी समोर उभी राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारू शकेल.”
ते म्हणाले की, “काय वातावरण होतं, ‘अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है’. आता मला भीती वाटायला लागली आहे की, जर ही अयोध्येची झांकी असेल, तर काशी, मथुरा किती लुटतील. बारा वर्षांमध्ये आपल्या भगव्याचं सरकार तिकडे आलं, असं आम्हाला वाटत होतं. हक्काचं सरकार आलं. अटल बिहारी वाजपेयी जे बोलले होते की, ‘अब हिंदू मार नहीं खाएगा’, पण ‘हिंदू को लूटने वाली सरकार वहां बैठी है’. हे आपलं दुर्भाग्य आहे. हे आरोप मी नाही करत, हे आरोप आता अनेक लोक बोलायला लागले आहेत. पहिली सुरुवात आपल्या लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या एक-दोन वर्षांपूर्वी केली की, केदारनाथ मंदिर आहे, तिथलं जवळपास कित्येक किलो सोनं हे लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत की, त्यांनी उज्जैनच्या इथल्या सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकालचे इथे आणि आता अयोध्येमध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येमध्ये एक आयएएस ऑफिसर बोलतायत, जे पूर्वी गृह सचिव होते की, त्यांनी त्यांच्या आईचे दागिने वितळवले आणि जवळपास १ किलो सोन्याचा मुलामा देणारं ‘रामचरितमानस’ तिकडे त्यांनी दान केलं होतं. तेही गायब झालं. नऊ-नऊ तास त्यांना तिथे बसवलं जातंय आणि उत्तरेच दिली जात नाहीयेत. आपण शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती. आपण उपकार नव्हते केले, आपण एक कर्तव्य केलं होतं. ‘फुलाची नाही, तर फुलाची पाकळी’ म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती. चांदीची वीट दिली होती. सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेलं हे सगळं? याची मला शिसारी येते. शिसारी एवढ्यासाठी येते की, पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व हे घाणेरडं हिंदुत्व आहे. हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. हे तिथलेच साधू-संत आता म्हणतात की, सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. एका साधू-संतांचे वाक्य असं आहे की, ‘हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते है, तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है’. साधू-संतांशी तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयांचा माल हडप करताय. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा भोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुलाची नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतल्या कष्टाच्या पैशातला एक पैसा, दोन रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करताय. लाज वाटली पाहिजे या लोकांना हिंदू म्हणून घ्यायची. म्हणून मी आज तो नारा परत बुलंद करतोय, जेव्हा हिंदू भयग्रस्त होता आणि कोणाचीही हिंमत होत नव्हती की, ‘मी हिंदू आहे’ बोलायची, तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’. ते हिंदुत्व तुम्हाला पुन्हा जागं करायचं आहे. हा हिंदू काही वेडा नाहीये, पावसात चिंब भिजून सुद्धा रामरक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे आणि रामभक्त कसे आहेत, हे अजून जर काही राज्यकर्त्यांना कळले नसेल तर, त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की, प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती, त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे, तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका जाळून साफ केल्याशिवाय राहणार नाही. जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत, जे आपल्यावरती टीका करतायत, त्यांना मी सांगू इच्छितो की, अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल, तर आमच्यासोबत रामाची रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे, आम्हाला भाजपामुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता, हा राम केवळ तुमचा नाही, हा राम माझा सुद्धा आहे. हा राम तमाम हिंदूंचा आहे. सर्व हिंदुस्थानच्या सर्व नागरिकांचा आहे. म्हणून त्या भोंदू हिंदुत्व रक्षकांना सांगतोय की, काय उगाच नाव घेऊन ‘आचार्य’ वगैरे तुम्ही काही उपाध्या लावताय, स्वतःच्या स्वतःला म्हणून कोणी आचार्य बनत नाही. एक सागर तिकडे बसलेला आहे, अयोध्येत. त्याने म्हणे मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केलेली. मान्य आहे तुम्हाला? एवढं बोलून तो थांबलेला नाही सागर, त्याने पुढे म्हटलं की, जसे ईडी वगैरे छापे टाकतात, तसं शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी पैसा लागायचा, तेव्हा त्यांनी सुरतेवरती छापे टाकले, ते तसे टाकले. आम्हाला शिवचरित्र शिकवतोय. या सगळ्याची निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. नाहीतर चोराला सांगितलं की, तुझ्या चोरीचा तपास तूच लाव, तर चार दिवसांमध्ये यांच्या तपासाचा निकाल येईल आणि क्लीन चिट देऊन सगळ्यांना मोकळं सोडून दिलं जाईल. आज मी देशातील तमाम हिंदूंना विनंती करतोय, जागे राहा, जागे राहा. शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंमध्ये जाग आणली होती. आज हिंदूंना संमोहित केलं जातंय. या संमोहनातून बाहेर या. तुमचा गैरफायदा घेतला जातोय. भोळेपणा सोडून द्या. कट्टर कडवट रामभक्त, शिवभक्त, ‘जय शिवराय’, ‘जय श्रीराम’ करून जे राम मंदिर चोरतायत, राम मंदिराची तिजोरी चोरत आहेत, त्यांना जाब विचारा. त्यांना सांगा, तुम्हाला चोरांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये, अजिबात नाहीये. जे जे चोर आहेत, त्या चोरांनी प्रभू श्रीरामाचं नाव घेता कामा नये. त्याचा पवित्र भगवा हातामध्ये घेता कामा नये. तमाम हिंदूंना मी आवाहन करतोय की, तुम्ही चोरांची रक्षा करायला रस्त्यावर येऊ नका. आमच्यासोबत प्रभू रामाची रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. जे आमच्यावरती आरोप करतील, ते चोररक्षक आहेत.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “आजपर्यंत मला म्हणत होते की, हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं. अरे हा काय तमाम हिंदू इकडे एकवटलेला आहे. तुम्ही कुठे आहात? आणि मी व्यासपीठावरून टाकलेली ठिणगी जी आहे, ती मला महाराष्ट्रामध्ये गावागावांत, खेड्यापाड्यांमध्ये दिसली पाहिजे. रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, हे जिथे जिथे राम मंदिर असेल, जिथे जिथे हनुमान मंदिर असेल, मंदिर नसेल तर भर चौकामध्ये रामाची प्रतिमा लावा आणि तिकडे तुम्ही रामरक्षा पठण करा. कारण महाराष्ट्र जेव्हा पुढे जातो, पुढे सरकतो, तेव्हा देश त्याच्या मागे जातो. आज महाराष्ट्र एका दिशेने चाललेला आहे. देशाला वाचवण्यासाठी चाललेला आहे. हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी चाललेला आहे. रामाचं रक्षण करण्यासाठी चाललेला आहे. मी देशातल्या सगळ्यांना आवाहन करतोय की, चला आपण एकजुटीने या चोरांना तडीपार करूया. जी मी घोषणा दिलेली आहे, ‘अब हिंदू माफ नही करेगा’. झालं तेवढं खूप झालं. तुमचं संमोहनशास्त्र आता आमच्यावरती चालणार नाही. तुमची मोहिनी विद्या आमच्यावरती चालणार नाही. कारण असं म्हणतात की, प्रभू रामाचा जप केल्यानंतर भूत वगैरे सुद्धा पळून जातं. हे कोण आहेत? यांना पळायला किती वेळ लागेल? घ्या प्रभू रामाचं नाव, घ्या शिवरायांचं नाव, बोला ‘हर हर महादेव’ आणि आता जी जाग आलेली आहे, ती जाग जाऊ देऊ नका. झोपू नका. जागे राहा आणि जोपर्यंत या सगळ्या चोरीचा निष्पक्षपातीपणे निकाल लावला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.”





























































