
मंडणगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील तुळशी-माहू घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीमुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, मंडणगड, बाणकोट, वेळास, देव्हारे तसेच शेजारील दापोली तालुक्यातील केळशी, मांदिवली, आडे व उटंबर परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. मुंबई आणि पुण्याच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय झाली असून, प्रशासनाकडून कोसळलेली दरड युद्धपातळीवर हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला जोडणाऱ्या लोणंद-राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या आठ वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. हा मार्ग डोंगर आणि घाटमाथ्यातून जात असून, महामार्गाच्या कामासाठी डोंगर खोदण्यात आले आहेत. संततधार पावसामुळे या खोदलेल्या डोंगराची माती आणि मोठमोठाले दगड थेट रस्त्यावर येत असल्याने आधीच चिखलमय झालेल्या मार्गावर अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. दरड कोसळल्यामुळे मार्ग मोकळा होईपर्यंत वाहनचालकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने या नवनिर्मित मार्गावर दरड कोसळण्याचे सत्र वाढले असून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. मंडणगड आणि दापोली तालुक्यातील केळशी, वेळास, बाणकोट, देव्हारे, उंबरशेत यांसह जवळपास ३५ ते ४० गावांना जोडणारा हा मुख्य आणि जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज एसटी बसेस, दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या रस्त्यावर वारंवार दरडी कोसळत असल्याने प्रवासी वाहतुकीसह व्यापारी वाहतुकीचाही मोठा खोळंबा होत आहे.





























































