Ratnagiri News – रघुवीर घाट धोक्याच्या छायेत; भूस्खलनाचा वाढता धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा तसेच पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट सध्या धोकादायक अवस्थेत असून, संरक्षक भिंती, सुरक्षित रेलिंग आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे पर्यटक व वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याची तसेच रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे ४,२०० फूट उंचीवर असलेला रघुवीर घाट पावसाळ्यात हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र घाटातील अनेक धोकादायक वळणांवर संरक्षक भिंती, जाळी किंवा रेलिंग नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. भूस्खलनाची शक्यता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

याबाबत भाजपचे नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “रघुवीर घाट हा कोकणातील महत्त्वाचा पर्यटनस्थळ आहे. मात्र विकासाऐवजी केवळ रस्ते, पाखाड्या आणि समाज मंदिरांपुरतेच नियोजन मर्यादित राहिले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या घाटाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आहे.”

खेडेकर यांनी पुढे सांगितले की, रघुवीर घाटातील धोकादायक परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असून, घाटाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असून. बाराही महिने पर्यटनासाठी हा परिसर सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पावसाळ्यात रघुवीर घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आणि पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासनाने तातडीने संरक्षक भिंती, रेलिंग आणि इतर सुरक्षा उपाययोजना उभाराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.