
‘नीट’ पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’मधील गोंधळाप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या ११ दिवसांपासून उपोषणाला बसलेले लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती बुधवारी अधिकच खालावली आहे. वैद्यकीय तपासणीनुसार, उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे वजन सात किलोहून अधिक कमी झाले असून ते आता ५९.४० किलोवर आले आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात, देशभरातील परीक्षांमधील अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांची जबाबदारी घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी सीजेपीकडून केली जात आहे.
दरम्यान, सीजेपीच्या मूळ X हँडलवरील बंदी उठवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, संस्थेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी याला आंदोलनाचा मोठा विजय म्हटले आहे. तसेच जंतरमंतरवरच एका स्वतंत्र मंचावर ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) पाच सदस्यांनीही आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे.



























































