
बाजी पासलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. बारा मावळपैकी एक असलेल्या मोसे खोऱ्यातील पिढीजात देशमुख असणारे बाजी पासलकर. ते मोसे खोऱ्यातील पिढीजात वतनदार होते. निगडे-मोसे गावापासून ते धामन-ओव्होळपर्यंतची 84 गावांची देशमुखी त्यांच्याकडे होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळातील तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा विजापूरच्या अदिलशाहने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. मात्र या लढाईत ते जखमी झाले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडला. सासवड येथे त्यांची समाधी असून पुण्यातील ‘वीर बाजी पासलकर शस्त्र संग्रहालय’ येथे शिवकालीन 260 हून अधिक शस्त्रांचे प्रदर्शन आहे. जे पर्यटकांना आणि अभ्यासकांना आकर्षित करते. तसेच वरसगाव धरण जलाशयाला ‘वीर बाजी पासलकर’ यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.
























































