शब्दमुद्रा – ‘पंडवानी’ सम्राज्ञी तिज्जनबाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

छत्तीसगडच्या पारंपरिक पंडवानी लोककथा सादरीकरणाला जागतिक स्तरावर सन्मान मिळवून देणाऱ्या कलाकार तिज्जनबाई यांचे नुकतेच निधन झाले. तिज्जनबाई यांचे योगदान मांडणारा हा लेख.

तिज्जनबाईंचा जन्म जंगलात राहणाऱ्या सामाजिकदृष्टय़ा अत्यंत अभावग्रस्त, अतिदलित, शेतात मजुरी करून गुजराण करणाऱ्या समाजात झाला. मात्र त्यांनी ’व्यक्तीची भाग्यरेषा लिहून येत नसून ती आपली आपणच लिहायची असते’ हे सिद्ध केलं. तिज्जनबाईंनी लहानपणी एकदा आजोबा ब्रिजलाल यांचे गायन ऐकलं. ते त्यांना फार आवडलं.

त्यांनी तसं आजोबांना सांगितलंही. आजोबांनी मग त्यांना जे ऐकलं ते गायला सांगितलं. त्या घाबरल्या. थोडंसं गायल्या. ते ऐकून आजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आपल्या नातीमध्ये असामान्य प्रतिभा असल्याची जाणीव त्यांना झाली. आजोबा ‘पंडवानी’ गायचे. म्हणजे महाभारतातल्या पांडवांचं गुणगान! त्या दिवसानंतर तिज्जनबाई रोज आजोबांना गाऊन दाखवायच्या. अल्पावधीतच त्या आजोबांसारखे गाऊ लागल्या. त्यांच्या गायनाची चर्चा पंपोशीत होऊ लागली. विलक्षण प्रतिभा आणि समर्पण पाहून लोककलावंत उमेदसिंह यांनी त्यांना अनौपचारिकपणे प्रशिक्षित केलं.

?वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी एका शाळेत त्यांनी आपल्या कलेचं पहिलं सादरीकरण केलं. त्यांची कला प्रेक्षकांना इतकी आवडली की, त्यांना बक्षिसापोटी दहा रुपये मिळाले. या दिवसानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात एक पददलित स्त्राr पंडवानी कसं गाऊ शकते असा आक्षेप सनातनी लोकांनी घ्यायला सुरुवात केली. कारण तोवर ही कला फक्त पुरुषच सादर करू शकत होते. तिज्जनबाई पहिल्या स्त्राr की, ज्यांनी ही परंपरा तोडून पंडवानी गायलं. त्यांनी पंडवानीचा तोंडवळाच बदलून टाकला. सर्वस्वी नव्या, आगळ्यावेगळ्या ढंगात रंगमंचावर आणलं. हे बघून प्रेक्षक दंग झाले. गायकी तर अशी की, पुरुष कलावंतांच्या गायकीला जवळपासही फिरकू दिलं नाही. सवर्ण समाजाने मात्र त्यांच्यावर विषारी टीका केली. वडिलांना धमकावले. कुटुंब आणि गावातल्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. शेवटी त्यांना गावातून परागंदा व्हावं लागलं. मात्र त्या आपल्या कलेपासून मागे हटल्या नाहीत.

तिज्जनबाईंनी पहिल्यांदा आपली कला पेश केली त्या वेळी पंडवानी स्त्राr गायिका फक्त बसून गायच्या. रंगमंचाखाली बसून पुरुष गायकांच्या सुरात सूर द्यायच्या. केवळ पुरुष गायकांनीच उभे राहून गायचं असा प्रघात होता. हा प्रघात तिज्जनबाईंनी मोडीत काढला. हा एक प्रकारे पुरुषप्रधान मानसिकतेवर केलेला जोरदार प्रहार होता. त्यांची शैली तुफान लोकप्रिय झाली. लोक त्यांच्या पंडवानीचा आस्वाद घ्यायला रात्री धावत-पळत यायचे. गावं-खेडी-शहरातल्याच नाहीत, तर दुर्गम-पहाडी-आदिवासी-जंगल परिसरातल्या साऱ्या रसिकांच्या गळय़ातल्या त्या ताईत झाल्या. इतकी अमाप लोकप्रियता त्यांनी मिळवली. त्यांची कीर्ती देशापर्यंतच सीमित न राहता परदेशातही पोहोचली. अख्तरीबाई, हिराबाई बडोदेकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसची आई), गौहर खान, सुब्बालक्ष्मी, जानकीबाई, गिरिजादेवी आदी दिग्गज कलावंतांसारखी ख्याती त्यांनी मिळवली.

रंगमंचावर सिंहासारखी गर्जना, भारदस्त नि नजरेत भरणारे व्यक्तिमत्त्व, उंच अंगकाठी, लालभडक साडी, केसांवर चमकता कुंकू, कपाळावर मोठी गोल बिंदी, हातात तंबोरा असं त्यांचं रूप प्रेक्षकांना विस्मयचकित करून टाकायचं. तिज्जनबाई एकटय़ाने रंगमंचाचा संपूर्ण अवकाश व्यापून टाकायच्या. लोक त्यांच्यावर दाद आणि बक्षीस म्हणून पैशांची उधळण करीत. श्रेष्”‰भारतीय नाटय़कर्मी हबीब तन्वीर यांनी त्यांना एकदा ऐकलं नि त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. तिज्जनबाई यांना पद्मश्री (1988), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1995), पद्मभूषण (2002), बिलासपूर विद्यापीठाची डी.लिट असे मानसन्मान मिळाले. त्यांनी 1980 मध्ये इंग्लंड-फ्रान्स-स्वित्झर्लंड-जर्मनी-थायलंड- मॉरिशस-टर्की-रोमानिया-सायप्रस-माल्टा देशांत सांस्कृतिक राजदूत म्हणून भेट देऊन आपल्या कलेचा आविष्कार घडवून भारताचे नाव उज्ज्वल केलं आहे. त्यांच्या निधनाने भारतीय लोक संस्कृती आणि लोककलेचं अद्भुत नि अनवट पर्व संपलं आहे.