ओठाच्या जखमेवर टाके घालण्यासाठी भूल दिली, 18 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमधील कन्नूर येथे एका रुग्णालयात एका 18 महिन्यांच्या बाळाला ओठावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूल देण्यात आली. मात्र भूल देताच ते बाळ बेशुद्ध पडलं व दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कुटुंबाने डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रुग्णालयाने बाळाचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे.

देवांश शौर्य असे त्या बालकाचे नाव असून, तो कन्नूरमधील एरामम-कुट्टूर येथील रहिवासी असलेल्या टी. सूरज आणि विजीषा यांचा एकुलता एक मुलगा होता. 5 जुलै रोजी घराबाहेर खेळताना पडल्यामुळे देवांशच्या ओठाला जखम झाली होती. त्याला तातडीने मथामंगलम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्राथमिक उपचार देण्यात आले.

त्यानंतर त्याला पय्यानूर येथील ‘बेबी मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले, जिथे त्याच्या जखमेला टाके घालण्यासाठी त्याला भूल देण्यात आली. भूल दिल्यानंतर तो बेशुद्ध पडल्याचा आरोप आहे. बालकाची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने कन्नूर येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

डॉक्टरांवर गुन्हा दाखल

बालकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर अंजली पोदुवाल यांच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉ. अंजली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ‘बेबी मेमोरियल हॉस्पिटल’ने वैद्यकीय निष्काळजीपणाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. “बालकाला भूल दिल्यानंतर लगेचच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. त्यानंतर त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी कन्नूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.” असे रुग्णालयाचे म्हणने आहे.