
>> दादासाहेब येंधे
सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे कचऱ्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती प्लॅस्टिकच्या पिशव्यांचीच. प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा नष्ट होत नाही, त्यामुळे तो सर्वत्र पसरलेला दिसतो. त्यामुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात. ही समस्या शहरांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही तर आज खेडेगावांतही प्लॅस्टिक कचऱ्यामुळे नाले, गटारे तुंबलेल्या दिसून येतात.
पूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पर्याय नव्हता. त्यामुळे कापडी पिशव्या वापरल्या जात होत्या. मग आता तसे का बरं होत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे आज मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून सामान आणणे हे मोठेपणाचे लक्षण व फॅशन मानली जात आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारी असणाऱ्या गावांमध्ये, शहरांमध्ये, समुद्राच्या पाण्याच्या तळाशी प्लॅस्टिक साचलेले दिसून येत आहे. इतका प्लॅस्टिकचा वापर आहे. ही एका भीषण धोक्याला जन्म घालणारी गोष्ट आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
खरेतर कापडी पिशव्या बनविण्यासाठी घरामध्ये बऱ्याच जुन्या साडया पडलेल्या असतात. या साड्यांपासून आपण पिशव्या तयार करू शकतो. त्या घरच्या घरीही करता येतात किंवा बाहेरूनदेखील शिवून आणता येतात. आपण कॅरीबॅगचा वापर का करतो; कारण ती घडी घालून आपल्याला सहजपणे ठेवता येते. पण आपण कापडी पिशव्यांचीदेखील अशी घडी घालू शकतो. प्लॅस्टिक कुजत नाही. प्लॅस्टिकच्या विघटनास किंवा प्लॅस्टिक नष्ट होण्यास 400 ते 500 वर्षे लागतात. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कागदाचा किंवा सुती कापडाचा वापर करता येऊ शकतो. याचा गांभीर्याने प्रत्येकाने विचार करायला हवा. कागदाचे नैसर्गिकपणे विघटन होण्यास, नष्ट होण्यास पाच दिवसांचा कालावधी लागतो. तर सुती कापडाचे विघटन होण्यास पाच महिने लागतात. त्यामुळे या गोष्टी पर्यावरणपूरक आहेत.
























































