Ratnagiri News – पाकिस्तानशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाकडून चिपळुणातील दोघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानातील दहशतवादी टोळीचा प्रमुख शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियावर संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी रात्री चिपळुणातील दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दोघांची अनेक तास कसून चौकशी करण्यात आली असून प्राथमिक चौकशीनंतर त्यांना काही अटीसह सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या दोघांची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टी याच्याशी संपर्क साधल्याचा संशय आहे. त्या माध्यमातून नेमका कोणत्या विषयावर संवाद झाला, कोणती माहितीची देवाणघेवाण झाली का, तसेच या संपर्कामागील उद्देश काय होता, याचा तपास एटीएसकडून सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याचे सांगितले जात असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित तरुणांना शहराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि आता चिपळूण येथील काही तरुणांचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, सोशल मीडियावरील संशयास्पद संपर्कांच्या अनुषंगाने दहशतवादविरोधी पथकाचा तपास सुरू आहे.