Dapoli News – अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ, दापोलीत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण; तहसीलदार यांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत नोंद झालेल्या सलग घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, समाजातील विकृत प्रवृत्तींबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

शाळा, महाविद्यालये तसेच शिकवणीसाठी घराबाहेर जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालक साशंक झाले आहेत. मुलींना एकट्याने बाहेर पाठवताना भीती वाटत असल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. दापोलीसारख्या शांत, सुसंस्कृत आणि शैक्षणिक परंपरा लाभलेल्या तालुक्यात अशा घटना घडत असल्याने समाजमन अस्वस्थ झाले आहे.

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, पालकांसाठी मार्गदर्शन, संवेदनशील भागांत पोलिस गस्त वाढविणे आणि महिला सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, संबंधित प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. मुलींची सुरक्षितता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.