
चिपळूण तालुक्यातील महत्त्वाच्या कोकण रेल्वेच्या सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी पादचारी उड्डाणपूल उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांच्या या कामाला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, कोकण रेल्वे सावर्डे प्रवासी संघटना आणि आमदार यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सावर्डे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ वर प्लॅटफॉर्मची सुविधा असली तरी फलाट क्रमांक २ वर प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांना थेट जमिनीवर, चिखल व गवतामध्ये उतरावे लागत होते. तसेच एका फलाटावर गाडी उभी असल्यास दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत कोकण रेल्वे सावर्डे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे आणि सदस्यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आमदारांनीही या मागणीसाठी विशेष प्रयत्न केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १ ते २ दरम्यान प्रवासी पादचारी उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र नुकतेच अध्यक्ष सचिन कोल्हापुरे यांना प्राप्त झाले.
दरम्यान, सावर्डे स्थानकावरील इतर सुविधांचाही प्रश्न अद्याप कायम आहे. फलाट क्रमांक १ वर अपुरी शेड असल्याने पावसाळ्यात प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागते, तर फलाट क्रमांक २ वर ना प्लॅटफॉर्मची सुविधा आहे, ना प्रवासी निवारा. त्यामुळे पंचक्रोशीतील सुमारे ६० गावांतील प्रवाशांना अनेक वर्षांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
प्रवासी संघटनेने या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही रेल्वे प्रशासनाकडे केली असून, उड्डाणपुलाच्या मंजुरीनंतर उर्वरित मागण्याही लवकर पूर्ण होतील, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.




























































