गिरनारच्या पायऱ्यांवरून सिंहाने मुलाला उचलून नेले; जंगलात नेऊन फडशा पाडला, 25 दिवसात 6 हल्ले झाल्याने पायरी मार्ग भाविकांसाठी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौराष्ट्रात सिंहांनी धुमाकूळ घातला असून गेल्या 25 दिवसांत सहा हल्ल्यांच्या घटना घडल्या. गुजरातच्या जुनागढमधील गिरनार पर्वताच्या पायऱ्यांवरूनहू एका 12 वर्षांच्या मुलावर सिंहाने हल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटे 5.45 च्या सुमारास घडली. आपल्या कुटुंबासोबत अंबाजी मंदिराला भेट देण्यासाठी गेलेल्या या मुलाला सिंहाने घनदाट जंगलात ओढत नेले. वनविभागाने केलेल्या शोध मोहिमेदरम्यान, जंगलात मुलाचे कपडे, बूट आणि मृतदेह सापडले. गिरनार पर्वतावर 10 हजार पायऱ्यांवर दत्त पादुकांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. मुंबई, पुणे व संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज शेकडो भाविक गिरनार यात्रेसाठी जात असतात. हे पर्वत गिर अभयारण्यात येते व जंगलात सिंहांचा व बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडा जिल्ह्यातील मेहमादाबाद तहसीलच्या मोडाज गावातील एका कुटुंबाने शनिवारी गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली होती. ते प्रवेशद्वारापासून सुमारे 50 पायऱ्या चढत असताना, अंधारातून अचानक एक सिंह बाहेर आला आणि त्याने मयूर सिंग चौहान (12) नावाच्या मुलाला त्याच्या काकांच्या हातातून ओढून त्याच्यावर हल्ला केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेमुळे यात्रेकरूंमध्ये घबराट पसरली आहे.

घटनेच्या वेळी सुमारे 50 ते 60 यात्रेकरू गिरनार चढत होते. घटनेची बातमी मिळताच पोलीस आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने काही तासांनंतर सिंहाला पकडले. या घटनेनंतर गिरनारचा मुख्य मार्ग भाविकांसाठी तात्काळ बंद करण्यात आला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यापासून या परिसरात तीन सिंह फिरताना दिसले होते, तरीही, पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही.