Nanded News – विष्णूपुरी जवळील उड्डान पुलाला भगदाड; केंद्रीय पथक दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विष्णूपुरी भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील दोन दिवसापूर्वी उड्डान पुलाला भगदाड पडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार केंद्रीय पथक दिल्लीहून दाखल झाले असल्याची माहिती प्रकल्प संचालक महेश पाटील यांनी सामनाशी बोलताना दिली.

भूकंपाच्या दिवशी म्हणजेच ९ जुलै रोजी सकाळी विष्णूपुरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर उड्डान पुलाचा खालील भाग कोसळून तेथे भगदाड पडले होते. यामुळे एकच खळबळ माजली होती. सदरचा उड्डान पुल वाहतुकीसाठी सुरु झाला नसून, काम अंतिम टप्प्यात असताना पुलाच्या खालील भिंतीचा भाग पूर्णतः कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. काही शासकीय अधिकार्‍यांनी भूकंपाच्या धक्क्यामुळे हे भगदाड पडले असावे असा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी या घटनेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर भगदाड पडलेल्या या उड्डान पुलाची पाहणी करण्यासाठी नवीदिल्लीहून उच्चस्तरीय केंद्रीय पथक पाठविणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार ते पथक आज सायंकाळी नांदेडात दाखल झाले असून, उद्या सकाळी साडेदहा वाजता सदरचे पथक या उड्डान पुलाची पाहणी करणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक महेश पाटील यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, आज सायंकाळी हे पथक नांदेडात दाखल झाले आहे. अधिकार्‍यांची चर्चा करुन उद्या तसेच जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेवून उद्या सकाळी दहा वाजता हे पथक या पुलाची पाहणी करणार आहे.